Tuesday, 13 December 2016

आधुनिक तंत्रज्ञान सोयाबीन लागवडीचे


      महाराष्ट्रामध्ये सोयाबीन हे प्रमुख तेलबिया पीक आहे. चांगले उत्पादन व भाव यामुळे सोयाबीन लागवडी खालील क्षेत्रात मागील काही वर्षात झपाट्याने वाढ झाली आहे. सोयाबीन पिकाचे उगमस्थान चीन आहे असे मानले जाते. सोयाबीनच्या बियामध्ये तेलाचे प्रमाण २० टक्के व प्रथिनाचे प्रमाण ४० टक्के आहे. खाद्य तेलामध्ये भारतासह जगामध्ये सोयाबीनतेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, त्यामुळे सोयाबीन पिकास महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. सोयाबीन पिकाची लागवड प्रामुख्याने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये केली जाते. सोयाबीन पीकाच्या मुळावरील गाठी सहजीव पद्धतीने १२५-१५० किलो नत्र स्थिर करून जमिनीचा पोत संतुलित ठेवण्यास मदत करतात. पिकाच्या फेरपालटीमध्ये सोयाबीनला महत्वाचे स्थान आहे. सोयाबीन हे अल्पकालावधीचे पीक असल्याने ऊस, कापूस, तूर, फळबाग इत्यादीत आंतरपीक म्हणून घेता येते. तसेच हे द्विदलवर्गीय पीक असल्याने फेरपालटीचे पीक म्हणून ऊस, हरभरा, गहू यासारख्या रब्बी पिकांच्याआगोदर घेता येते. त्यामुळे जमिनीचा कस व पोत सुधारण्यास मदत होते. जमीनिची सुपिकता वाढविन्या सोबतच उत्तम नफा मिळवून देणारे पीक अशी सोयाबिनची ओळख आहे. पण आपली सरसरी उत्पादकता खूप कमी म्हणजे साधारण पणे ९०० ते १८५० किलो प्रति हेक्टर इतकी आहे. याच्या वाढीसाठी सुधारीत तंत्र वापरन्याची आवश्यकता आहे.
 

लागवड तंत्रज्ञान :-
      हवामान : सोयाबीन पिकास २५-३३c तापमान वाढीसाठी पोषक ठरते. ज्या भागात ७००-१००० मि.मी. च्या दरम्यान पाऊस पडतो, तेथे सोयाबीन पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळू शकते. सूर्यप्रकाशाच्या कालावधीचा देखील पिकाच्या वाढीवरती परीणाम होतो. भरपूर फुलो-यासाठी निदान दहा तासांपेक्षा जास्त काळोख्या रात्री असाव्या लागतात. म्हणून खरीप हंगामात हे पीक चांगले येते. खरीप हंगामात १०० ते १२५ मि. मी. पाऊस झाल्यानंतर पेरणी १० जूनपासून १५ जुलैपर्यंत वाफशावर करावी. १५ जुलैनंतर पेरणी केल्यास उत्पादनात थोडीशी घट येते. शक्‍यतो सोयाबीनची पेरणी ३० जुलैनंतर करू नये.


     जमीन : उत्तम सेंद्रीय पदार्थ असलेली, मध्यम स्वरुपाची भुसभुशीत, पाण्याचा उत्तम निचरा होणार्‍या जमिनीत सोयाबीन पिकाची वाढ चांगली होते. चोपण व क्षारपड तसेच एकदम हलक्या (मुरमाड) जमिनीत अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, त्यामुळे अश्या प्रकारच्या जमिनीत पेरणी टाळावी. जमिन मे महिन्यात नांगरट केलेली उन्हाळ्यात तापू दिलेली स्वच्छ असावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ पर्यत असलेली निवडावी. 
     पेरणी : पेरणीसाठी प्रमाणित बियाणे वापरावे. बियाण्याची उगवणशक्ती ७० टक्‍क्‍यांपेक्षा कमी असल्यास बियाणे त्याप्रमाणे वाढवावे. बियाणे प्रमाणित नसल्यास पेरणीपूर्वी एक आठवडा बियाण्याची उगवणशक्ती तपासून पाहावी. बियाण्याची उगवणशक्ती ६० टक्‍क्‍यांपेक्षा कमी असल्यास बियाणे पेरणीसाठी वापरू नये. सोयाबीनचे उत्पादन कमी येण्याचे मुख्य कारण म्हणजे शेतातील झाडांची संख्या कमी असणे हे होय. सोयाबीनच्या झाडांची संख्या प्रति हेक्‍टरी ४ ते ५ लाखांपर्यंत असावी. झाडांची ही संख्या योग्य राहण्यासाठी हेक्‍टरी ७५ किलो बियाणे वापरावे. सोयाबीन पिकाची पेरणी यांत्रिक तसेच टोकन पद्धतीने करता येते. सरी वरंभा पद्धतीने पेरणी करावायची झाल्यास टोकण पद्धतीचा अवलंब करावा. नुकत्याच झालेल्या संशोधना नुसार कमी तसेच अनिच्छित पावसाच्या प्रदेशात बी. बी. एफ (ब्रोड बेड फरो) यंत्राच्या साह्याने पेरणी केल्यास मुलस्थानी जलसंधारण होऊन पिकाची वाढ उत्तम होते व परिनामी अपेक्षित उत्पन्न मिळते, तसेच अधिक पाऊस झाल्यास जास्तीचे पाणी वाफ्यातुन सरीद्वारे बाहेर पडते. पेरणी करतांना दोन ओळींत ३० किंवा ४५ सें.मी., तर दोन रोपांत ५ ते ७ सें.मी. अंतर राहील, अशाप्रकारे करावी. बियाणे ३.० ते ५.० सें.मी. खोलीपर्यंतच पेरावे. यापेक्षा जास्त खोलीवर बी पडल्यास बियांची उगवण कमी होते, परिनामी उत्पन्नात लक्षणीय घट येते.  
     पूर्वमशागत भरखते : सोयाबीन पिकाच्या वाढीसाठी भुसभुशीत जमीन अधिक चांगली असते. त्यासाठी उन्हाळ्यात जमीनीची खोल नांगरट करून चांगले कुजलेले कंपोस्ट खत हेक्टिरी २५ ते ३५ गाड्या पेरणी अगोदर जमिनीत टाकून कुळवाच्या पाळ्यांनी जमिनीत चांगले मिसळावे. भरखतामुळे जमीन भुसभुशीत राहून पिकाच्या मुळ्या खोलवर जान्यास मदत होते व पिकाची वाढ जोमदार होण्यास मदत होते. त्याप्रमाणे शेतातील अगोदर घेतलेल्या पिकाची धसकटे व इतर काडीकचरा वेचून शेत स्वच्छ ठेवावे (त्यामुळे पीक वाढीच्या काळात संभाव्य रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होते).  
      जिवाणू खते व बीजप्रक्रिया : बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी तसेच बियांची उगवण अधिक चांगली होण्यासाठी प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रॅम कार्बेन्डॅझिम किंवा खोडकिडीचा उपद्रव होऊ नये म्हणून हेक्‍टरी १ किलो फोरेट (१० जी) जमिनीत मिसळावे. पेरणीसाठी वापरण्यात येणार्‍या बियाण्यास पेरणीपूर्वी २५० ग्रॅम जिवाणू खत (ब्रॅडी रायझोबियम जॅपोनिकम) प्रति १० किलो बियाण्यास प्रक्रिया करून घ्यावी. प्रक्रिया केलेले बियाणे थोडा वेळ सावलीत सुकवील्यानंतर २४ तासांच्या आत पेरणीसाठी वापरावे. तसेच ७.५ किलो प्रति हेक्टरी स्फुरद विरघळवणाऱ्या जिवाणूंचे खत, जमिनीत ओलावा असतांना शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून पेरणीपूर्वी शेतात पसरावे. या खतामुळे जमिनीतील अविद्राव्य स्फुरदाचे विद्राव्य स्वरूपात रूपांतर होते व ते पिकाला उपलब्ध होऊन उत्पादन वाढते. 
      सुधारित वाण : सोयाबीन पेरणीसाठी खलील सुधारित वाणांचा वापर करावा.
अ.क्र.
वणाचे नाव
पीक परीपक्व होण्याचा कालावधी (दिवस)
उत्पादन
(क्विंटल/हे.)
पेरणीसाठी प्रती हे. बियाणे (किलो)
जे-एस- ३३५
९५-१००
२२-२५
७५
जे-एस- ९३-०५
९०-९५
२३-२५
७५
एनआरसी-३७
१०५-११०
२५-३०
६०-६५
टिएएमएस ९८-२१*
९५-१०७
२५-२७
७५
एम. ए. सी. एस. -५८
९५
२५-३५
७५
टी. ए. एम. एस. -३८
९०-९५
२३-२८
७५
मोनेटा
७५-८०
२०-२२
७५

(*संरक्षीत ओलीत देण्याची सुविधा असणार्‍या शेतकर्‍यांसाठी शिफारशीत)


      वरखते : सोयाबीन पिकास माती परीक्षणानुसार हेक्टरी २० किलो नत्र, ६० ते ८० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश पेरणीपूर्वी किंवा पेरणीच्या वेळी द्यावे. त्याचप्रमाणे प्रतिहेक्टरी २० किलो गंधक, २५ किलो झिंक सल्फेट आणि १० किलो बोरॅक्स ची मात्रा पेरणीपूर्वी शेणखतामधुन किंवा कंपोस्ट खताद्वारे द्यावी.

      संजीवकाचा वापर : सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी सायकोसील ५०० पी.पी.एम. ची (१० मि.ली. प्रति १० लीटर पाणी) फवारणी पीक फुले लागन्याच्या अवस्थेत असताना करावी.

      आंतरमशागत : तणांच्या नियंत्रणासाठी पेरणीच्या वेळेस प्रति हेक्टरी २.५ लिटर (बासालीन) फ्लुक्लोरॅलिन किंवा ४ लिटर लासो (ऍलाक्लोवर) तणनाशके ८०० लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारावीत. पीक १५ ते २० दिवसांचे असताना एक कोळपणी व २५-३० दिवसांनी पहिली व ४०-४५ दिवसांनी दुसरी खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवावे.

      रोगनियंत्रण : मूळकुजव्या रोगाच्या नियंत्रणासाठी बियाण्यास पेरणीपूर्वी कार्बेन्डॅझिमची प्रक्रिया करावी. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब (७५ डब्ल्यू.पी.) एक किलो प्रति हेक्टपरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी १ लिटर टील्ट (प्रोपिकोनॅझोल) या बुरशीनाशकांची ८०० ते १००० लिटर पाण्यात मिसळून पीक २५, ३५ व ४५ दिवसांचे असताना फवारणी करावी.

      कीडनियंत्रण : खोडमाशी, मावा, तुडतुडे व सुरवातीच्या काळात येणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी उगवणीनंतर ७ दिवसांनी १०० ग्रॅम थायमेथोक्झा्म २५ डब्ल्यूजी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पाने खाणाऱ्या किंवा पाने गुंडाळणाऱ्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी ट्रायझोफॉस, मिथोमिल, क्विनॉलफॉस (दीड मि.लि. प्रति लिटर) प्रमाणात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यास डेल्टामेथ्रिन ३०० ते ४०० मि.लि. या प्रमाणात ७०० ते ८०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

      काढणी, मळणी व साठवण : साधारणपणे सोयाबीनची सर्वे पाने झडून जातात. तसेच ९५ टक्के शेंगा पक्व झालेल्या असतात तेव्हा पीक कापणी योग्य झाले असे समजावे. सोयाबीन पिकाची कापणी योग्य वेळी करणे खुप महत्वाचे असते. सोयाबीनच्या कापणी व मळणीच्या वेळी सोयाबीनमधील ओलाव्याचे  प्रमाण १३-१५ टक्के दरम्यान असणे अत्यावश्यक आहे. जेणे करून सोयाबीनची उगवणशक्ती टिकून राहून गुणवत्ता सुध्दा चांगली राहील. सोयाबीनची पाने पिवळी होऊन शेंगा पक्व झाल्यावर पिकाची विळ्याने कापणी करून शेतातच २-३ दिवस चांगले वाळवावे. वाळलेले सोयाबीनचे पीक खळ्यावर पसरून मळणी यंत्राच्या साह्याने मळणी करावी. बियाणे पुढील वर्षी वापरावायाचे असल्यास मळणी यंत्राचे आरपीएम ३५० ते ४०० पर्यंतच राहिल याची काळजी घ्यावी (अन्यथा बियाण्याची उगवण क्षमता कमी होते.) मळणी झाल्यानंतर बी चांगले उफणून घ्यावे व नंतर १-२ दिवस उन्हात वाळवून पोत्यात साठवण करावी. (साठवण करतांना पोत्यांची थप्पी पाच पेक्षा अधिक उंच नसावी); सुधारित पद्धतीने लागवड केल्यास साधारणपणे हेक्टरी २५ क्विंटल पर्यंत उत्पादन मिळु शकते.

लेखक : - प्रविण बा. बेरड आणि अमोल विजय शितोळे (पी. एच. डी. कृषि) डॉ. पंजाबराव देशमुख
         कृषि विद्यापीठ, अकोला.


3 comments:

  1. Sir, Pradeshik bhashet (Marathi) soybean lagvadi baddal savvistar mahiti dilya baddal Dhanyawaad.

    ReplyDelete
  2. Online Gambling and Casino - Dr. MD
    A new partnership between online gambling and casino companies has begun to draw in 포천 출장샵 large investments. The 충청북도 출장샵 state 김제 출장마사지 has opened 출장마사지 a 영주 출장샵 new, regulated and licensed  Rating: 4.8 · ‎4 reviews

    ReplyDelete