अंबाडी : (हि. पाटवा, पाटसान; गु. भींडी; अंबोई; क. पुंडी; सं. अंबष्टा; इ. मेस्ता डेक्कन हेंप, अंबारी हेंप; लॅ हिबिस्कस कॅनाबिनस). सु. ३-४ मी. उंचीचे हे सरळ वाढणारे, वर्षायू व काटेरी झुडूप माल्व्हेसी कुलातील ही वनस्पती मूळची आफ्रिकेतील असून तिचे शास्त्रीय नाव हिबिस्कस कॅनाबिनस आहे. भारत, बांगलादेश, थायलंड, पाकिस्तान इ. देशांत मोठ्या प्रमाणावर या वनस्पतीची लागवड करतात. उष्ण कटिबंधातील इतर देशांतही याची कोठे कोठे लागवड केलेली आढळते. भारतात अंबाडीची लागवड फार प्राचीन काळापासून केली जात आहे. खरीप ज्वारी, बाजरी किंवा कडधान्याबरोबर मिश्र पीक म्हणून साधारणतः या पिकाची लागवड करण्यात येते. भारतात आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार व महाराष्ट्र या राज्यांत अंबाडीची लागवड होते. भारतात अंबाडीचे क्षेत्र सुमारे ३,६४,३७२ हेक्टर असून त्यापैकी महाराष्ट्रात जवळजवळ ५०,६०० हेक्टर क्षेत्र असावे. महाराष्ट्रात विशेषतः सोलापूर, धुळे,जळगाव या कमी पावसाच्या जिल्ह्यांत अंबाडी लावतात. ते वाखासाठी, गुरांच्या वैरणीसाठी आणि पालेभाजीसाठीदेखील लावतात. तंतुमय धाग्यांसाठी ताग या वनस्पतीखालोखाल अंबाडीचा क्रमांक येतो.
अंबाडी झाडाचे महत्त्वाचे भाग (उदा. बिया, फुले, पाने)
Ø फुलांपासून जॅम व जेली, पानांपासून लोणचे, बियांपासून बेसन आणि फुलांपासून चटणी तयार करणा. अंबाडीच्या खोडापासून धागे निघतात.
Ø अंबाडीच्या कोवळ्या पाल्याची भाजी करतात तर बोंडांची चटणी करतात. कोवळ्या फांद्या पानांसह जनावरांना वैरण म्हणून खाऊ घालतात. गूळ तयार करताना अंबाडीचा वापर केला जातो. पुणें प्रांतांत अंबाडी गुरांनां खावयास घालतात व पाल्याची भाजी करतात.
Ø
बी कोंबड्यांच्या आणि गुरांच्या खुराकासाठी वापरतात. काही लोक पचनशक्ती सुधारण्यासाठी बी भाजून खातात. अंबाडीच्या बियांपासून शुद्ध व स्वच्छ तेल निघतें; म्हणून अंबाडीचें बीं गळीताच्या धान्याप्रमाणें इंग्लंडला पाठविलें जातें. अंबाडीच्या बियांपासून खाद्यतेलही काढतात. त्यात मोठ्या प्रमाणात ओमेगा-३ हे प्रतिऑक्सिडीकारक असते. या तेलाचा उपयोग जैवइंधन म्हणूनही करतात. बियामध्यें औषधी गुण असून शक्तिवर्धक व मूत्ररेचक म्हणून त्यांचा उपयोग करतात. लाल अंबाडीचीं फळें रक्तपित्तव्याधिनाशक असून त्यांची चटणी, फळरसमिश्रित पाक वगैरे तयार करण्याकडेहि उपयोग होतो. गुरास दूध जास्त सुटण्यास अंबाडीचें बीं भरडून व शिजवून त्यांत तेल, गूळ घालून देतात.
Ø
अंबाडीचीं वाळलेलीं झाडें दहा दिवस पाण्यांत भिजवून मग त्यांच्या सालीच्या बट्या काढतात. त्या काठीनें झोडून पाण्यांत धुतात व अशा रीतीनें स्वच्छ वाख काढतात. मुख्यत: अंबाडीच्या तागाचा उपयोग दोर करण्याकरितां व हलक्या प्रतीचीं तरटें करण्याकडे करतात. दोर, पिशव्या, मासेमारीसाठी लागणारे जाळे विणण्यासाठी वाखाचा उपयोग केला जातो. महाराष्ट्रांतील अंबाडीला लंडनच्या बाजारांत “बिमलिपट्टण ताग” असें म्हणतात. दिवसेंदिवस या तागाची मागणी वाढत आहे. बंगालच्या तागापेक्षां अंबाडी हलक्या प्रतीची असते. अनेक देशांत कागद बनविण्यासाठी या वनस्पतीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात आहे.
अंबाडीचे प्रकार
अंबाडीचे गावरानी, देव अंबाडी, लाल अंबाडी आणि पिवळी अंबाडी असे प्रकार आढळतात. ही वनस्पती नैसर्गिक पद्धतीने चांगल्या प्रकारे वाढते व उत्पादन देते. अंबाडी लागवडीसाठी खर्च फारसा असा येत नाही.
हवामान : हे उष्ण हवामानात वाढवणारे पीक असून वाढीच्या काळात १५⋅५० २६⋅६० सें. तपमान आणि आर्द्र हवामान असल्यास त्याची चांगली वाढ होते वार्षिक पर्जन्यमान ५०-६० सेंमी. लागते.
जमीन : रेताड पोयट्याची, मध्यम प्रकारची किंवा चांगल्या निचऱ्याची काळी जमीन या पिकास चांगली मानवते. पुरेसा पाऊस पडल्यास निचऱ्याच्या भारी जमीनीतील अंबाडी बऱ्याच वेळी सपाटून उंच म्हणजे ३ मी. पर्यंतही वाढते.
लागवड : तिची लागवड खरीप हंगामात करतात. दिनमान लहान व्हायवयास लागले की पीक फुलावर येते. हे पीक बुहतेक मिश्र पीक म्हणून घेतले जात असल्यामुळे मुख्य पिकासाठी केली जाणारी मशागत या पिकाला अनायासेच मिळते. निव्वळ हेच पीक स्वतंत्रपणे घ्यावयाचे असल्यास एकदा जमीन खोल नांगरून दोनतीन वखरपाळ्या देऊन ती तयार करतात.
मिश्र पीक असल्यास मुख्य पिकाला दिलेल्या खताचा फायदा अंबाडीला मिळतो. निव्वळ अंबाडीच्या स्वतंत्र पिकाला साधारणत: खत देण्यात येत नाही. स्वतंत्र पिकासाठी जून-जुलै महिन्यात पेरणी करतात. दोन फणांत ३०-३६ सेंमी. अंतर असलेल्या पाभरीने दर हेक्टरमध्ये २५-३० किग्रॅ. बी पेरतात. केवळ वाखासाठी अंबाडीची लागवड करताना बियांचे प्रमाण थोडे जास्त आणि ओळींतील अंतर थोडे कमी ठेवतात. सुरवातीला विरळणी व रोपे लहान असताना एकदोन वेळा कोळपणी देण्यापलीकडे पिकाची विशेष काही आंतर-मशागत करण्यात येत नाही.
काढणी : हे पीक साधारतः चार-सहा महिन्यांचे आहे. शेतकऱ्याला स्वतःच्या उपयोगाकरता वाख पाहिजे असल्यास पीक पूर्ण तयार झाल्यानंतर ते जमिनीसपाट कापतात किंवा ताटे उपटून घेतात. ती काही दिवस उन्हात वाळवून त्यांचे भारे बांधून ठेवतात. नंतर भारे सोडून खळ्यात ताटे पसरून मोगऱ्यांनी बोंडे बडवून त्यातील बी काढून घेतात. नंतर त्या ताटांचे पुनः भारे बांधून वहात्या पाण्यात कुजत घालतात. मुद्दाम वाखासाठी केलेले पीक जास्तीत जास्त ५० टक्के बोंडे पक्व होत आल्यानंतर कापतात. ताटांचे शेंडे कापून त्यांच्या लहान मोळ्या बांधतात. त्या मोळ्यांचे ठराविक आकारमानाचे भारे बांधतात. ते पाण्याच्या टाक्यांत किंवा नदीनाल्याच्या डोहात कुजत घालतात. ते तरंगत राहून वाहून जाऊ नयेत म्हणून त्यांच्यावर वजनासाठी ओंडके किंवा दगड ठेवतात. १०-१५ दिवसांत ताटे कुजतात व वाख काष्ठमय भागापासून सहजपणे वेगळा होऊ शकतो. त्या वेळी हे ताटांचे भारे पाण्यातून बाहेर काढतात व ते सोडून त्यातील पाचदहा ताटे एका वेळी हातात घेऊन मजूर त्यांच्यावरील वाख सोलून काढतात. त्या वाखाच्या लहान लहान पेंढ्या करून त्या दगडावर धोपटून धुतात. वाखाला चिकटलेला केरकचरा काढून तो स्वच्छ करतात. नंतर उन्हात खळखळीत वाळवून गठ्ठे बांधून विक्रीसाठी बाजारात पाठवितात.
उत्पन्न : खास वाखासाठी लावलेल्या पिकापासून एका हेक्टरमधून १,०००-१,२०० किग्रॅ. इतका उत्तम वाख मिळतो. वाख आणि बी अशा दोन्ही उत्पादनांसाठी लावलेल्या पिकापासून १,०००-१,२०० किग्रॅ. वाख आणि ५००-७०० किग्रॅ. बी मिळते. पण हा वाख जरा दुय्यम प्रतीचा समजला जातो. पहिल्या प्रकारच्या पिकाच्या हिरव्या ताटांपासून शेकडा ४ टक्के वाख मिळतो तर दुसऱ्या प्रकारच्या पिकाच्या वाळलेल्या ताटांपासून मिळलेल्या वाखाचे प्रमाण १६-१७ टक्के पडते. मिश्र पिकापासून उत्पन्न कमी मिळते; कारण त्यात अंबाडीच्या ताटांची संख्या कमी असते.
तेल : अंबाडीच्या बियांत १८-२० टक्के तेल असते. त्यापैकी १३ टक्क्यांपर्यंत तेल गिरणीत दाबाखाली काढता येते. विद्रावक पद्धतीचा उपयोग केल्यास यापेक्षा जास्त तेल निघते. हे तेल नितळ पिवळ्या रंगाचे असते व त्याला वास नसतो. पेंड अळशीच्या किंवा सरसूच्या पेंडीसारखी दिसते. तेल दिवे, वंगण, साबण, लिनोलियम, रोगण व रंग यांकरिता उपयुक्त असते. शुद्ध तेल खाण्याकरिता वापरतात.
पालेभाजीचे पीक : महाराष्ट्रात आणि भारताच्या इतर काही भागांत अंबाडीचे पीक फक्त पालेभाजीसाठीच खरीप आणि उन्हाळी हंगामांत बागायती पीक म्हणून लावतात. निचरा होणारी गाळवट जमान चांगली मानवते. जमीन दोनदा नांगरून हेक्टरमध्ये २०-२५ टन शेणखत घालून कुळवाने जमिनीत ते मिसळून घेऊन ३·६X१·८ मी.चे वाफे करून त्यांच्यमध्ये २५ किग्रॅ. बी फेकतात. लगेच पाणी देतात. पुढे दर आठवड्याने पाणी देतात. रोपे ४-५ आठवड्यांची झाली म्हणजे ती उपटून त्यांच्या जुड्या बांधून विकतात. एक हेक्टरमधून ४,०००-५,००० किग्रॅ. पालेभाजी मिळते.
लाल अंबाडी : (क. केंपु-पुंद्रिके, सोप्पू; इं. रेड-जमेका सॉरेल, रोझेल; लॅ. हिबिस्कस सब्डरिफा; कुल-माल्व्हेसी). अंबाडीच्या वंशातील ही दुसरी जाती मूळची ईस्ट इंडीजमधली असून उष्ण कटिबंधात बोर्निओ, ब्राझील वगैरे भागांत आणि भारतात बिहार, ओरिसा, प. बंगाल, गुजरात, तमिळनाडू, आंध्र व महाराष्ट्र या भागांत लागवड होतो. हे बिनकाटेरी १·५-२·० मी. उंच वर्षायू क्षुप असून खोड, फांद्या, पाने, फुले वगैरे जांभळट लाल असतात. खोडापासून बळकट, रेशमी, नरम व सतेज धागा मिळतो; लाल अंबाडीच्या झाडापासून सडवून वाख काढतात, त्याला बाजारांत रोझेलें ताग म्हणतात. तामिळनाडूत त्यापासून दोऱ्या व पिशव्या बनवतात. लाल संदलांपासून व छदांपासून ‘रोझेल जेली’, मुरंबे व मद्य बनवितात, वाळल्यावर ती चिंचेसाऱखी उपयुक्त असतात.
निचऱ्याची, कार्बनी पदार्थयुक्त, गाळवट जमीन यास चांगली मानवते. मशागत करून भाजीच्या पिकासाठी १·२ X १·५ मी. चौरस अंतरावर पावसाळी हंगामात रोपे लावतात. पाने व फळे काढण्याचे काम चौथ्या महिन्यात सुरू होऊन पुढे २-३ महिन्यांत संपते. एका हेक्टरमधून ६,००० किग्रॅ. पर्यंत संदले आणि तितकीच पालेभाजी मिळते.
कीड : अंबाडीला मावा, तुडतुडे यांच्यासारख्या कीटकांचा फार उपद्रव होतो. त्यांच्या प्रतिकारासाठी पिकावर ०.०२ टक्के तीव्रतेचे एंड्रिन हे कीटकनाशक फवारतात.
रोग : मूळकूज (मॅक्रोफोमिना फॅसिओलाय), खोडाच्या शेंड्याची कूज (फोमा जात) व करपा (कोलेटॉट्रिकम हिबिसाय) हे रोग पडतात. यावर पिकांची फेरपालट करणे हा उत्तम उपाय असल्याची शिफारस केली जाते.
लेखक - श्री. विक्की एन. नंदेश्वर (पी. एच. डी. कृषि) डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ,
अकोला
No comments:
Post a Comment