बोर्डो मिश्रण या ताम्रयुक्त बुरशीनाशकाचा शोध सन १८८२ मध्ये मिलार्डेट या बोर्डो विद्यापीठातील शास्त्रज्ञाने लावला. चुना,
मोरचूद व पाण्याच्या योग्य प्रमाणातील मिश्रणाला बोर्डो पेस्ट (मलम) असे म्हणतात. हे मिश्रण प्रभावी बुरशीनाशक असून,
वेगवेगळ्या तीव्रतेच्या बोर्डो मिश्रणाचा फवारणी व झाडाच्या बुंध्याला लावण्याकरिता वापर केला जातो. बोर्डो मिश्रणाची उपयुक्तता सिध्द झाल्यापासून आजपर्यंत विविध पिकांच्या रोग नियंत्रणासाठी या मिश्रणाचा वापर परिणामकारक रित्या केला जात आहे आणि आजही शेतकरी त्याचा वापर करत आहेत. बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी मोरचूद, कळीचा चुना आणि पाणी यांचा वापर करतात, हे घटक सर्वत्र उपलब्ध असल्यामुळे शेतकरी हे मिश्रण स्वतःच तयार करु शकतात व इतर बुरशीनाशकाच्या तुलनेत अत्यंत
स्वस्त आहेत.
पावसाळ्यात शेतामध्ये पावसाचे पाणी जास्त काळ साठते. त्याचा लिंबूवर्गीय फळझाडांच्या बुंध्याशी संपर्क आल्यास वर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हमखास होतो. लिंबूवर्गीय मातृवृक्षांच्या म्हणजे संत्रा, मोसंबी, लिंबू व रंगपूर लिंबाच्या झाडांच्या बुंध्यांना अनेक प्रकारच्या बुरशीजन्य रोगापासून प्रादुर्भाव होतो. वर्षातून कमीत कमी दोन वेळेस बुंध्यांना बोर्डो पेस्ट(मलम) लावावी. संत्रा, मोसंबी, लिंबू व रंगपूर लिंबू या प्रमुख मातृवृक्षांच्या संरक्षणासाठी बोर्डो पेस्टचा(मलम) वापर फायदेशीर ठरतो. लिंबूवर्गीय फळबागांसाठी पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर अशा दोन वेळेस बोर्डो पेस्टचा (मलम) केलेला वापर, डिंक्या रोगाच्या बंदोबस्ताकरीता उपयोगी ठरतो. उन्हाळ्यात बोर्डो मलम लावल्यामुळे झाडाच्या बुंध्याचे उन्हापासून
संरक्षण होते व पावसाळा सुरु झाल्यावर
बोर्डो मलम पावसाच्या पाण्यामध्ये विरघळून
बुंध्याशी गेल्याने मूळाशी असलेल्या रोगकारक बुरशीचा नाश
होतो. असा दुहेरी फायदा मिळतो.
संत्राबागेमध्ये फायटोप्थोरा (डिंक्या) या रोगाचे बिजाणू जमिनीत असतात. पावसाच्या जोरदार सरींमुळे मातीसोबत त्यातील रोगाचे बिजाणू झाडाच्या बुंध्यावर उडतात. बुरशीच्या वाढीस अनुकूल ओलसर दमट वातावरणात झाडाच्या पेशीत प्रवेश करतात, त्यामुळे डिंक्या रोगाची लागण बागेत होते. अनेक बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे फळझाडांचा जोम कमी होतो. फळझाडांचे आर्थिक आयुष्य कमी होते. फळबागेचे रोगांपासून रक्षण करण्याकरिता प्रतिबंधक उपाय म्हणून वर्षातून कमीतकमी दोन वेळा म्हणजेच उन्हाळा सुरु झाल्यावर आणि पावसाळा संपल्यानंतर फळझाडांच्या बुंध्याला बोर्डो पेस्ट(मलम) लावणे आवश्यक आहे.
बोर्डो पेस्ट (मलम) तयार करण्याची पद्धत :
चुना व मोरचूद यांच्या घट्ट द्रावणास बोर्डो मलम (पेस्ट) असे म्हणतात. बोर्डो पेस्ट तयार करण्यासाठी बोर्डो मिश्रणाप्रमाणेच चांगल्या प्रतीचे मोरचूद आणि उच्च प्रतीचा हवाबंद डब्यातील चुना घ्यावा. बोर्डो पेस्टमध्ये एक किलो मोरचूद, एक कि.ग्रॅ. कळीचा चुना आणि दहा लिटर पाणी वापरतात.
१)
१ किलो स्वच्छ मोरचूद पूड व १ किलो कळीचा चुना प्लॅस्टिकच्या वेगवेगळ्या बादलीत किंवा मडक्यात ५-५ लिटर पाण्यात रात्रभर भिजत घालावे.
२)
चुना व मोरचूदचे दुसऱ्या दिवशी अन्य बादलीत मिश्रण करावे.
३)
मिश्रण करीत असताना द्रावण काठीने सतत ढवळावे.
४)
तयार झालेले घट्ट द्रावण म्हणजेच बोर्डो पेस्ट होय.
५)
तयार झालेला बोर्डो मलम झाडांना लावण्यास योग्य असल्याची खात्री करून घ्यावी.
६) बोर्डो मलम झाडाच्या बुंध्यास चांगला चिकटून राहावा याकरिता मिश्रणामध्ये स्टीकर किंवा साबुदाण्याचे पाणी मिसळावे. या करिता २५० ग्रॅम साबुदाणा २ लिटर पाण्यात चांगला उकळून गाळून घ्यावा. थंड झाल्यानंतर तयार बोर्डो मिश्रणात मिसळून झाडाच्या बुंध्याला ही पेस्ट लावावी.
साबुदाण्याच्या चिकट पाण्याचा उपयोग स्टिकरसारखा झाडांच्या बुंध्यांना बोर्डो पेस्ट घट्ट बसण्यासाठी होतो. साबुदाण्याचे चिकट पाणी तयार करण्यासाठी दोन लिटर उकळत्या पाण्यात २५० ग्रॅम साबुदाणा संपूर्ण विरघळेपर्यंत उकळावा. साबुदाण्याचे चिकट पाणी थंड झाल्यावर मोरचूद आणि चुन्याच्या एकत्रित द्रावणात ओतावे. अशाप्रकारे चांगल्या प्रकारचे पेस्ट तयार झाल्यावर बुंध्यांना लावावे. बुंध्याचे बोर्डो पेस्ट वाळल्यानंतर खोडास निळसर आकाशी रंग येतो. बोर्डो पेस्ट व बोर्डो मिश्रण तयार केल्यावर ताबडतोब वापरावे. जास्त कालावधी झाल्यास त्याचा परिणाम होत नाही.
६) बोर्डो मलम झाडाच्या बुंध्यास चांगला चिकटून राहावा याकरिता मिश्रणामध्ये स्टीकर किंवा साबुदाण्याचे पाणी मिसळावे. या करिता २५० ग्रॅम साबुदाणा २ लिटर पाण्यात चांगला उकळून गाळून घ्यावा. थंड झाल्यानंतर तयार बोर्डो मिश्रणात मिसळून झाडाच्या बुंध्याला ही पेस्ट लावावी.
साबुदाण्याच्या चिकट पाण्याचा उपयोग स्टिकरसारखा झाडांच्या बुंध्यांना बोर्डो पेस्ट घट्ट बसण्यासाठी होतो. साबुदाण्याचे चिकट पाणी तयार करण्यासाठी दोन लिटर उकळत्या पाण्यात २५० ग्रॅम साबुदाणा संपूर्ण विरघळेपर्यंत उकळावा. साबुदाण्याचे चिकट पाणी थंड झाल्यावर मोरचूद आणि चुन्याच्या एकत्रित द्रावणात ओतावे. अशाप्रकारे चांगल्या प्रकारचे पेस्ट तयार झाल्यावर बुंध्यांना लावावे. बुंध्याचे बोर्डो पेस्ट वाळल्यानंतर खोडास निळसर आकाशी रंग येतो. बोर्डो पेस्ट व बोर्डो मिश्रण तयार केल्यावर ताबडतोब वापरावे. जास्त कालावधी झाल्यास त्याचा परिणाम होत नाही.
बोर्डो पेस्ट तयार करताना घ्यावयाची काळजी :
बोर्डो
पेस्ट फवारणीच्या वेळी फडक्यातून किंवा बारीक चाळणीतून
गाळून घ्यावे. तसेच मिश्रण करतेवेळी तिसऱ्या भांड्यात दोन्ही द्रावण ओतताना प्रथम
चुन्याचे आणि पाठोपाठ मोरचुदाचे द्रावण ओतून मिश्रण सारखे ढवळावे. एकदा तयार
केलेले मिश्रण त्याच दिवशी वापरावे. तयार केलेल्या मिश्रणाची चाचणी निळा लिटमस
पेपरने घ्यावी. निळा लिटमस पेपर द्रावणात बुडविल्यानंतर जर लाल झाला तर मिश्रणात
अधिक मोरचूद आहे किंवा द्रावण आम्ल आहे असे समजावे. मिश्रणातील जास्त मोरचूद
नाहीसे करण्यासाठी मिश्रणात परत चुन्याचे द्रावण निळा लिटमस पेपर निळाच राहीपर्यंत
टाकावे. चाचणीची दुसरी पद्धत म्हणजे तयार मिश्रणात लोखंडी खिळा किंवा
सळई दहा सें.मी. द्रावणात बुडविले असता त्यावर
तांबूस रंग चढला तर (तांबडा दिसणारा थर तांब्याचे सूक्ष्म कण जमून झालेला असतो) द्रावण फवारण्यास योग्य नाही असे समजून थोडी थोडी चुन्याची निवळी ओतावी. ही निवळी ओतण्याची
क्रिया लोखंडी खिळा किंवा सळई यावर जमणारा
तांबडा थर नाहीसा होईपर्यंत करावी म्हणजे मिश्रण वापरण्यास योग्य होईल. झाडांची
छाटणी केल्यानंतर फांद्या कापलेल्या ठिकाणी झालेल्या जखमेवर बोर्डो मलम(पेस्ट) लावल्यास रोगापासून संरक्षण होते. डिंक्याग्रस्त फळझाडाची रोगट साल धारधार व निर्जंतुक केलेल्या पटाशीने किंवा चाकूने काढून रोगट भाग १ टक्का पोटॅशियम परमॅंगनेटच्या द्रावणाने (१०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) निर्जंतुक करावा व त्यावर बोर्डो पेस्ट लावावी. काढलेली डिंक्याग्रस्त रोगट साल काळजीपूर्वक बागेबाहेर घेऊन जाळून नष्ट करावी.
लेखक:- अमोल विजय शितोळे (पी. एच. डी. कृषी)
Nice information
ReplyDelete