Friday, 16 December 2016

हवामानाचा किडीवर होणारा परिणाम



  आपल्या शेतातील पिकांवर विविध किंडीचा प्रादुर्भाव होत असतो व या किडी आपल्या पिकाचे दरवर्षी १५-२० टक्के नुकसान शेतात करत असतात. किडीचा पिकावर होणारा प्रादुर्भाव आणि बदलते हवामान यांचा एकमेकाशी विशिष्ट संबध असतो, म्हणून कीड व्यवस्थापनामध्ये हवामानाचा किडीवर होणारा परिणाम समजावून घेणे आवश्यक आहे. मागील काही वर्षात हवामानाचे बदलते स्वरूप त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सर्वसाधारणपणे किंडीची संख्या पावसाळ्यात जास्त असते त्या मानाने ती हिवाळ्यात कमी तर उन्हाळ्यात त्यापेक्षाहि कमी असते. परंतु सध्या बदलत्या हवामानामुळे किंडीचे प्रमाण वातावरणानुसार कमी अधिक प्रमाणात  बदलत व अनियमित आहे.
किंडीच्या  संख्येवर परिणाम करणारे  हवामानाचतील  घटक
   १) तापमान (Temperature) - वातावरणातील खूप जास्त किंवा अति कमी तापमान हे किडीच्या जीवनक्रमावर परिणाम करतात. उन्हाळ्यात खूप जास्त तापमानामुळे भरपूर किडी मरतात तर काही सुप्तावस्थेत जातात त्याला एस्टीवेशन (Aestivation) असे म्हणतात. उन्हाळ्यात अधिक तापमानामुळे किडीची संख्या कमी होते, अंडी देणे, चयापचय व जीवन वाढीच्या क्रिया मंदावतात, तसेच किडी एका ठिकाणावरून दुसरीकडे स्थलांतर करतात. अति कमी तापमानाला सुद्धा किडीची वाढ व रचनात्मक कार्य मंदावते व त्या सुप्तावस्थेत जातात त्याला हायबरनेषण (Hibernation) असे म्हणतात. किडी मध्ये त्यांचे शरीराचे तापमान हे वातावरणाच्या तापमानाशी कमी जास्त प्रमाणात  समप्रमाणात ठेवले जाते त्याला पोइकिलोथर्मिक (Poikilothermic) असे म्हणतात. वातावरणातील तापमानावर किडीचे अंडी देण्याचा दर खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. उदा. चौकोनी ठिपक्याचा पतंग (DBM) हि कीड फक्त 18 ते 22o C तापमानाला अंडी देतात. मनुष्याच्या केसातील “ऊ” सुद्धा 25o C पेक्षा  कमी  तापमानाला अंडी घालत नाही. वातावरणातील जास्त तापमानामुळे, किडीचे खाद्य नष्ट होऊन किडींची संख्या कमी होते किंवा मंदावते.
  २) प्रकाश (Light): प्रकाश हा किडीमध्ये ऊर्जेचा प्राथमिक स्रोत आहे.  प्रकाश व अंधाराच्या आधारावर किडींचे मुख्य कार्य सुरळीत चालते. प्रकाशामुळे किडीमध्ये बदल होत असतात व किडींच्या हालचाली, अंडी देण्याची क्षमता, वाढीचा स्तर, प्रजनन, खाद्य अशा गोष्टीवरती प्रामुख्याने प्रभाव पडतो. प्रकाश्याच्या आधारावर किडी मध्ये दोन प्रकार पडतात, पहिला ज्या किडी दिवसा कार्यरत असतात त्यांना डायअर्नल(Diurnal) असे म्हणतात. दुसरे ज्या  किडी रात्रीच्या वेळेस कार्यरत असतात त्यांना नॉक्चअर्नल(Nocturnal) असे म्हणतात. काही किडी फक्त अंधारातच अंडी देतात उदा. कपाशीवरील बोंड अळी, केसाळ अळी, कॉडलिंग पतंग इत्यादी तर काही किडींना अंडी देण्यासाठी प्रकाशाची गरज असते उदा. फळमाशी .
  ३) आद्रता (Humidity) : पावसाळ्यात जास्त आद्रता बऱ्याच किडींना मानवते तर हिवाळ्यात जशी जशी आद्रता कमीकमी होत जाते तशी किडींच्या  संख्येत घट होते. भात या पिकांवर येणाऱ्या तपकिरी तुडतुडे व इत्तर पिकावर येणार मावा या किडींचा प्रादुर्भाव आद्रतेमुळे वाढतो. साठवणीतील धान्यात नऊ टक्कया पेक्षा कमी आद्रता असल्यास धान्याला किडीचा उपद्रव होऊ शकत नाही, पावसाळ्यात धान्यातील आद्रता वाढल्यामुळे धान्य मऊ होते, त्यामुळे धान्यकिडी साठवणीतील धान्याचे खूप नुकसान करतात. उन्हाळ्यात तीन – चार दिवस धान्य व्यवस्तीत वाळऊन जर हवाबंद, स्वच्छ, कोरड्या कोठारात अथवा धातूच्या कोठ्यात साठविले तर पावसाळ्यात अशा धान्यास किडीचा उपद्रव होत नाही. जास्त आद्रते मुळे किडी बरोबर रोगाचे प्रमाण सुद्धा वाढते. हिवाळ्याच्या सुरवातीला म्हणजे ऑक्टोबर व नोव्हेंबर मध्ये किडींचा सुळसुळाट असतो परंतु नंतर वातावरण जसे जसे थंड होत जाते व आद्रता कमी कमी होत जाते तसे किडी निष्क्रिय होऊन सुप्तावस्थेत जातात त्यामुळे त्यांच्या विविध जीवन अवस्थाचा कालावधी वाढत जाते व किंडीची संख्या कमी होते .
  ४) पाऊस (Rainfall): किडीवर परिणाम करणाऱ्या घटकापैकी पाऊस हा महत्वाचा घटक असून अति पावसामुळे भरपूर किडी पाण्याबरोबर धुतल्या जाऊन पाण्यासोबत वाहून जातात तर खूप साऱ्या किडी मरण पावतात. पावसाळ्यात जमिनीत पाणी मुरल्यामुळे जमिनीत राहणाऱ्या किडी मातीत दबून मरतात तर काही कडक उन्हात आल्यामुळे प्रखर उष्णतेत मरण पावतात. परंतु तुरळक पडणारा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे किडी चा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढतो. ढगाळ वातावरण हे किडीसाठी पोषक समाजल्या जाते त्यामुळे अळी वर्गीय किडी व रस्शोषित किडी यांचा उपद्रव मोठ्या प्रमानावर होतो. मावा, खोडकिडे, फळे पोखरणाऱ्या अळीचा उपद्रव जास्त पावसामुळे कमी होतो, परंतु खोड माशीचा उपद्रव वाढतो. जास्त पाऊस होऊन मध्येच खंड पडल्यास लष्करी अळी, उंट अळी, शेंडा आणि फळ पोखरणारी अळी  , मावा , कोळी या किडींचा उपद्रव सुरु होतो .
  ५)  वारा (Wind) वाऱ्या मुळे सुद्धा किडींच्या जीवनक्रमावर प्रभाव पडतो. वाऱ्यामुळे किडी हवेसोबत एका ठीकानावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होतात. त्यामुळे किडींचा उपद्रव एका ठीकानावरून दुसऱ्या ठिकाणी प्रसारित होतो. हलक्या किडी, अंडी, कोष हे हवेसोबत प्रसारित होऊन नवीन ठिकाणी आपले अस्तित्व निर्माण करतात किंवा नवीन ठिकाणी खाद्य न मिळाल्यामुळे मरतात.
       प्रत्येक हवामान आठवड्यात कपाशीवरील रस शोषक किडींचा सरासरी प्रदुर्भाव बघता असे निदर्शनास येते कि मावा या किडीचा प्रादुर्भाव ऑगस्ट महिन्यात व डिसेंबर पासून पुढच्या हंगाम संपेपर्यंत आर्थिक नुकसानीच्या  पातळीपेक्षा वरती आढळून येतो. माव्याचे प्रादुर्भाव होण्यास दिवसाचे कमी तापमान व रात्रीची कमी आद्रता कारणीभूत आहे असे आढळून येते. तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव ऑगस्ट ते  ऑक्टोबर च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आर्थिक नुकसानीच्या वरती आढळून येतो आणि त्याला ढगाळ वातावरण, रात्रीच्या तापमानातील वाढ तसेच रात्रांदिवासाची जास्त आद्रता पोषक आढळून आली आहे. फुलकिडीच्या पोषक वाढीस ढगाळ वातावरण, रात्रीच्या तापमानात वाढ तसेच रात्रांदिवासाची जास्त आद्रता तर पांढऱ्या माशीच्या प्रदुर्भावास भरपूर सूर्यप्रकाश, रात्रीच्या तापमानात व पाऊसमानात घट हे वातावरण पोषक असल्याचे आढळून आले आहे . 
      अशा प्रकारे वातावरणातील विविध घटक किडींच्या जीवनक्रमावर बदल घडवून आणतात शेतकरी बंधूनी नियमित सर्वेक्षण करून, वाढलेल्या किडींचा ‘एकात्मिक कीड व्यवस्थापन” पद्धतीने बंदोबस्त केला तर कीड वेळीच नियंत्रणात येवून , आर्थिक नुकसान पातळी च्या खाली राखण्यात मदत होते.
 
लेखक -  किरण बुधवत (सहाय्यक प्राध्यापक), श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती

No comments:

Post a Comment