Friday, 16 December 2016

फेरोमोन ट्रॅप : एकात्मिक कीड नियंत्रणात त्याचे महत्व



       प्राणी वर्गातील कीटक हा सर्वात मोठा वर्ग आहे. कीटक म्हणजे सहा पायाचा सजीव, असा हा कीटक समूहात राहत असताना आपल्या समूहाशी किंवा इतर समूहाशी विविध पद्धतीने सुसंवाद किंवा संभाषण करून आपले खाद्य, संरक्षण व प्रजनन करीत असतात, ज्यामध्ये विशिष्ठ हालचाल करणे, विशिष्ठ आवाज काढणे, शरीराच्या विशिष्ठ अवयवाची हालचाल करणे, शरीरातून विशिष्ट गंध किंवा वास किंवा रसायन बाहेर टाकणे समाविष्ट असते. किटक स्वकियांशी सुसंवाद किंवा संबंध साधण्यासाठी शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा रासायनिक गंध सोडतात. तो गंध स्वकियांमध्ये विशिष्ट प्रकारच्या संदेशवहनाचे कार्य करतो. या वासामुळे नर/मादीमध्ये चेतना निर्माण होऊन नर-मादी एकमेकांकडे आकर्षित होतात आणि समागमासाठी योग्य जोडीदार मिळवू शकतात, त्यामुळे या गंधाला कामगंध (फेरोमोन) असे म्हटले जाते.  वेगवेगळ्या किडींचा फेरोमोन वेगवेगळा असतो. काही कीटकांमध्ये नर कीटक मादीला, तर काहींमध्ये मादी कीटक नराला आकर्षित करतात. कीटकांच्या या सवयी लक्षात घेऊन कृत्रिम कामगंध (फेरोमोन) तयार केले जातात. फेरोमोन सापळे मोठ्या प्रमाणात लावल्याने लिंग प्रलोभन रसायनांचे (ल्यूर) सूक्ष्म कण वातावरणात पसरतात. कीटकांच्या शरीरातून सोडला जाणारा गंध आणि वातावरणातील कृत्रिम रसायनांचा संदेश यातील फरक त्यांना कळेनासा होऊन त्यांचा गोंधळ उडतो आणि मिलन होऊ शकत नाही.
       कामगंध सापळयास इंग्रजीत 'फेरोमोन ट्रॅप किंवा 'फनेल ट्रॅप' असेही म्हणतात.हा कमी खर्चाचा व रासायनिक प्रदुषणविरहीत उपाय आहे. हा नरसाळ्याच्या आकाराचा असून प्लॅस्टिकचा बनविलेला असतो. त्याची खालची बाजू मोकळी असून त्यास एक प्लास्टिकची पिशवी लावण्यात येते. वरची बाजू एका झाकणाने झाकली असते. त्यास आतील बाजूस 'आमिष' लावण्याची सोय असते. त्यास मादीचा वास असणारे एक रसायन लावण्यात येते. त्यामुळे नर हा मिलनाकरिता मादीच्या शोधात कामगंध सापळ्याकडे आकर्षित होतो. यामध्ये प्रौढ पतंग आल्यास तो अडकून पडतो. त्यास बाहेर निघणे शक्‍य होत नाही. असे जमा झालेले नर पतंग पाच ते सात दिवसांत मरतात. अशा प्रकारे किडीची पुढील पिढी तयार होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत बाधा येते. त्यामुळे कीडनियंत्रण चांगल्या प्रकारे होते. अशा पद्धतीने प्रत्येक किडीसाठी वेगळा ल्यूर वापरून त्या त्या किडीचे व्यवस्थापन करता येते.
   एकात्मिक पिक व्यवस्थेमध्ये कामगंध सापळ्याचा वापर महत्वाचा आहे. रासायनिक निविष्ठांशिवाय शेती करणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. सर्वांत मोठी अडचण ही पीक संरक्षणाच्या बाबतीत शेतकऱ्यांना येत असते. भाजीपाला पिकांमध्ये तर रासायनिक कीडनाशकांचा वापर अतिशय काळजीपूर्वक करावा लागतो. पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर अधिक होत असतो. अळ्यांच्या नियंत्रणासाठी बाजारात विविध कीटकनाशके उपलब्ध आहेत. परंतु त्यांच्या किमती, त्यांच्या अनियंत्रित वा बेसुमार वापराचे होणारे प्रतिकूल परिणाम या सर्वांचा विचार केला असता एकात्मिक कीड व्यवस्थापनातील अन्य घटकांचा वापर वाढावयास हवा. त्याद्वारे किडींची पातळी कमी राखून निसर्गाचा समतोल राखला जातो. यामुळे प्रदूषण न होता मित्र कीटकांचे प्रमाणही योग्य राखण्यास मदत होते. एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये भौतिक, यांत्रिक, मशागत, जैविक आणि रासायनिक अशा सर्व समावेशक कीडनियंत्रण पद्धतींचा वापर केला जातो. या सर्व गोष्टींमध्ये अरासायनिक अशा सर्व समावेशक कीडनियंत्रण पद्धतींचा वापर केला जातो. यात कामगंध सापळ्यांचा (फेरोमोन ट्रॅप) वापर केल्यास कमी खर्चात कीडनियंत्रण होण्यास मदत होते. शेतातील किडींची संख्या आर्थिक नुकसानपातळीच्या खाली ठेवण्यासाठी फेरोमोन सापळ्यांचा वापर फायदेशीर ठरतो.
पिकांमध्ये सापळे वापरण्याचे पद्धत
१) सर्वेक्षणासाठी प्रत्येक जातीच्या कीटकांसाठी हेक्‍टरी पाच सापळे आवश्‍यक. किडीचे पतंग मोठ्या प्रमाणावर पकडण्यासाठी हेक्‍टरी 15 ते 20 सापळे गरजेचे. लहान क्षेत्र असल्यास सापळे शेताच्या आकारानुसार लावावेत.
२) सापळे लावताना पिकाच्या उंचीवर साधारणपणे एक ते दीड फूट उंचीवर लावावेत. दोन सापळ्यांमध्ये 15 ते 20 मीटर अंतर ठेवावे. शेताच्या आकारमानानुसार हे अंतर कमी - जास्त करता येईल.
३) सापळ्यामधील ल्यूर लावताना पॅकिंग वर दिलेल्या सूचनांचे पालन करून 15-21 दिवसांनंतर ल्यूर बदलावेत.
४) प्रत्येक जातीसाठी वेगवेगळे सापळे वापरावेत. सापळ्यात अडकलेले पतंग दर आठवड्याला काढून नष्ट करावे.
५) सापळा साधारणतः पिकाच्या उंचीनुसार जमिनीपासून दोन ते तीन फुटांवर राहणे आवश्‍यक.

वेगवेगळ्या पिकासाठी लागणारे फेरोमोन ल्यूर :-
अ.क्र.
ल्यूर चे नाव
किडीचे नाव
सापळा
पिक
हेली ल्यूर
हिरवी बोंड अळी
फनेल सापळा
कापूस ,तूर , हरभरा, टोमाटो, मिरची , मका
पेक्टीनो ल्यूर
गुलाबी बोंड अळी
डेल्टा स्ट्रीकि ट्राप
कापूस
गोस्सीप ल्यूर
गुलाबी बोंड अळी
फनेल सापळा
कापूस
स्पोडो ल्यूर
तंबाखू वरील पाणे खाणारी अळी
फनेल सापळा
सोयाबीन कापूस ,भुईमुग, सुर्यफुल , मिरची .
वीट ल्यूर
ठीपक्याची बोंड अळी
फनेल सापळा
भेंडी,  कापूस
ल्यूसी ल्यूर
शेंडा आणि फळ पोखरणारी अळी
वाटर ट्राप
वांगी
           
बोम्बिकोल ल्यूर
रेशीम अळी
-
मलबेरी
बाक्यू ल्यूर
फळ माशी
प्लाय ट्राप
काकडी , दोडका, दुधी भोपळा, कारली, ढेमसे , कलिंगड , खरबूज,
बॉडोर ल्यूर
फळ झाडावरील फळमाशी
फ्लाय ट्री ट्राप
संत्रा, आंबा , मोसंबी . पेरू, चिकू .

पिकांमध्ये सापळे वापराचे फायदे :–
१) किडीचे प्रौड व मादी यांची शेतातील स्थिती ठरविण्यासाठी कामगंध सापळ्याचा मुख्यत; उपयोग होतो.
२) सापळ्यात असणाऱ्या लिंग प्रलोभन रसायनांचे सुक्ष्मकण वातावरणात पसरल्यामुळे मिलनासाठी किडींना आपला जोडीदार शोधणे कठीण जाते.
३) कामगंध  सापळ्याच्या वापरामुळे किडींची आर्थिक नुकसानाची पातळी ठरवून योग्य वेळी कीटकनाशकाची फवारणी करता येते.
४) एकत्रित प्रलोभन सापळ्यांच्या वापरामुळे कीटकनाशके फवारणीचा खर्च टाळता येतो. सापळ्यांचा खर्च कीटकनाशकांच्या खर्चापेक्षा कमी असतो.
५)  सापळ्यात अडकलेल्या नर-मादी यावरून कीड नियंत्रणाची वेळ ठरविता येते.

                   फनेल सापळा  
                    वाटर ट्रॅप
       डेल्टा स्ट्रीकि ट्रॅप

                       
                                                     फ्लाय ट्री ट्रॅप 
सापळे वापरताना घ्यावयाची काळजी :-
१) सापळा बांबूस बांधताना घट्ट बांधावा, त्यामुळे वाऱ्याने पडणार नाही.
) ल्यूर लावताना हातास उग्र उदा. कांदा, लसूण यांच्यासारखा वास नसावा.
) ल्यूरचे पॅकिंग फोडण्यापूर्वी ते फाटलेले नसल्याची खात्री करून घ्यावी.
) पॅकिंग फाटलेले असले तर अपेक्षित परिणाम मिळत नाही.
) जोराची हवा व पाऊस असल्यास सापळ्यांचे वेळोवेळी निरीक्षण करावे. सापळ्यात येणारे पावसाचे पाणी काढण्याची व्यवस्था ठेवावी.
) सापळ्याची पिशवी बांबूस घट्ट बांधावी. त्यामुळे वाऱ्याने न फडफडता नुकसान होणार नाही.
७) ल्यूर वेळेवर बदलावेत. त्यामुळे अपेक्षित परिणाम मिळतात.
) सापळ्यात अडकलेले पतंग मेल्यानंतर वेळच्या वेळी ते काढून टाकावेत. अन्यथा, कुत्रे, मांजर, पक्षी हे सापळ्यातील मेलेल्या पतंगाकडे आकर्षित होऊन सापळ्यास नुकसान होण्याची शक्‍यता असते. सापळ्यात पावसाचे पाणी साचले व त्यात मेलेले पतंग असतील तर त्याचा दुर्गंध पाळीव कुत्र्यांस आकर्षित करतो. त्यामुळे कुत्रे अशा सापळ्यांचे नुकसान करतात. यासाठी सापळ्याच्या खालच्या बाजूस काट्याची फांदी लावल्यास फायदा मिळेल.

लेखक -  किरण  बुधवत (सहाय्यक प्राध्यापक), श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती

No comments:

Post a Comment