Saturday, 24 December 2016

जनावरांसाठी चारा पिकांचे नियोजन व चारा पिकांच्या जाती



                 दुग्ध व्यवसायामध्ये एकून खर्चाच्या ७० ते ७५ खर्च चारा व पशुखाद्यावर होतो, त्यासाठी जास्त चारा उत्पादन देणाऱ्या एकदल, द्विदल व बहुवार्षिक चारा पिकांची निवड करून वर्षभर हिरव्या चाऱ्यांचे उत्पादन घेणे गरजेचे आहे. पशु आहारामध्ये ७० टक्के भाग हिरव्या व सुक्या चाऱ्याचा असतो आणि ३० टक्के भाग हा पशु खाद्याचा असतो. हे लक्ष्यात घेता हिरव्या व सुक्या चाऱ्याचे वार्षिक नियोजन करणे महत्वाचे ठरते. जनावरांसाठी लागणाऱ्या एकूण चारा उत्पादनामध्ये एकदल व द्विदल पिकांचा समावेश करणे फार महत्वाचे आहे, तसेच सतत हिरव्या चाऱ्यासाठी बहुवार्षिक चारा पिकांची लागवड करणे गरजेच आहे.
               वर्षभर हिरवा चारा मिळवण्यासाठी हंगामानुसार पेरणी करणे गरजेचे आहे, परंतु खरिप हंगामात जास्त चारा पिकांची लागवड करणे गरजेचे आहे. खरिप हंगामात मका, ज्वारी, बाजरी, चवळी, स्टायलो, संकरीत नेपीअर, मारवेल इत्यादी तसेच रब्बी हंगामात बरसीम, लसुनघास, मका व ओट तर  उन्हाळ्यात मका, ज्वारी, चवळी इत्यादी या चारा पिकांची लागवड करावी.
                एक पूर्ण वाढ झालेल्या दुधाळ गायीला साधारणपणे १५ किलो एकदल व द्विदल चाऱ्याची व ५ किलो सुक्या चाऱ्याची गरज असते, हे लक्ष्यात घेता एका दुभत्या गायीस १० गुंठे जमीन आवश्यक असते. जर एखाद्या शेतकऱ्याकडे ५ ते ६ दुभत्या गायी असतील तर त्यानुसार ६० गुंठे क्षेत्रावर चारा पिकांची लागवड करणे गरजेचे आहे. एक गायीसाठी वार्षिक चारा पिकांचे नियोजन करायचे असल्यास हिरवा चारा ९ ते १० टन व सुका चारा २ ते २.५ टन आवश्यक आहे, त्यानुसार ६ गायींसाठी ६० गुंठे जमीन आवश्यक आहे. त्यातून अंदाजे ५५ ते ६० टन हिरवा चारा व २० ते २५ टन सुका चारा जनावरांना उपलब्ध होऊ शकेल. सुक्या चाऱ्यासाठी ज्वारीचा वापर करावा किंवा संकरीत नेपीअर, मारवेल सुद्धा योग्य प्रमाणात वाळवून जनावरांच्या आहारात वापरता येऊ शकतो. एकदल व द्विदल चारा कुट्टी करून एकत्र करून घ्यावा. संकरीत नेपिअर बांधाच्या कडेने लावावे, कोणताही चारा ५० टक्के फुलोऱ्यात असताना कापणी केल्यास जास्त अन्नघटक त्यापासून मिळतात. तीन वर्ष्यानंतर पिकांची फेरपालट करावी. जनावरांसाठी खालीलप्रमाणे चारा पिकांची पेरणी करावी.
क्र.
चारा पिकाचे नाव
पेरणीची वेळ
सुधारित वाण
१.
ज्वारी
ऑक्टोबर
रुचिरा, फुले अमृता, पुसा चारी, एमपी चारी
२.
मका
ऑक्टोबर, नोव्हेंबर
मांजरी कॉम्पोझिट, विजय, गंगा, सफेद २
३.
ओट
ऑक्टोबर, नोव्हेंबर
फुले हरिता, जेएचओ-८२२
४.
बरसीम
ऑक्टोबर, नोव्हेंबर
वरदान मेस्कावी जेवी -१, जेएचबी- १४६
५.
लसुनघास
ऑक्टोबर, नोव्हेंबर
आरएल- ८८, सिरसा- ९, आनंद-२,
  चारा पिकासाठी मका लागवडीचे तंत्रज्ञान :
        लागवडीसाठी सुपीक, कसदार व निचरा युक्त, मध्यम ते भारी जमीन या पिकाच्या वाढीसाठी आवश्यक आहे. लागवडीसाठी जमिनीची  एक खोलवर नांगरट करून घ्यावी. नंतर कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन चांगल्या प्रकारे भुसभुशीत करून व्यवस्थितरीत्या शेत पेरणीपूर्वी तयार करून घ्यावे. पेरणी वेळेत करणे उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. पेरणीसाठी हेक्टरी ७५ किलो बियाणे लागतील. पेरणी पाभरीने ३० से.मी. अंतरावर करावी. लागवडीपूर्वी १० किलो बियाणास २५० ग्रॅम जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी २० ते २५ गाड्या शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीत मश्यागातीच्या वेळी चांगले मिसळून द्यावे. पेरणीच्यावेळी प्रती हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो पालाश आणि ५० किलो स्फुरद द्यावे. पेरणी नंतर साधारणपणे एक महिन्याने नत्राचा दुसरा हप्ता हेक्टरी ५० किलो या प्रमाणात द्यावा. पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात एक कोळपणी व एक खुरपणी करावी. पिकांची वाढ व्यवस्थित रित्या होण्यासाठी ७ ते ८ पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. कापणी साधारणपणे ५० टक्के फुलोऱ्यात असताना करावी. साधारणपणे योग्य व्यवस्थापनात मक्याचे हेक्टरी ५५० ते ७०० क्विंटल हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.  


लेखक - श्री. धनंजय गायकवाड
पदव्युत्तर महाविद्यालय महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी (अहमदनगर)
 

No comments:

Post a Comment