Friday, 16 December 2016

भेंडी पिकावरील किडींचे एकात्मिक कीड व्यवस्थापन



आपल्या रोजच्या जेवणात भेंडीची भाजी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. मात्र भेंडीचे उत्पादन करताना किडींचा प्रादुर्भाव फार तमोठ्या प्रमाणात होतो व कधीकधी तर शेतकरयाचे खूपच नुकसान होते. भेंडीची साल नरम असते हे एक आणि तिचे पीक दमट हवामानात घेतले जाते हे दुसरे कारण ज्यामुळे त्यावर कीडकीटकांचा चटकन हल्ला होतो आणि 35-40% पर्यंत नुकसान होऊ शकते. कीडनाशकांच्या अति वापरामुळे उद्भवणारे प्रश्न, किडीपासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी भेंडीवर मोठ्या प्रमाणात कीडनाशके इ. फवारली जातात. मात्र ह्यामुळे कमी मुदतीत तयार होणाररया भेंडीमध्ये ह्या औषधांचे अंश नक्कीच शिल्लक राहतात आणि त्याचे वाईट परिणाम खाणार्याच्या प्रकृतीवर होतात.रासायनिक कीडनाशके सतत वापरल्यास किडींनाही त्यांची सवय होते आणि ते त्यांना दाद देत नाहीत. त्यामुळे तेच कीड  पुन्हा उद्भवतात शिवाय एकंदर पर्यावरणावर व इतर वनस्पतींवर घातक परिणाम होतात. त्यामुळे भेंडीसाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती अवलंबून कीड नियंत्रण करावे, भेंडी या पिकावर प्रामुख्याने ठिपक्‍यांची बोंड अळी ,तंबाखूवरील पाने खाणारी अळी, घाटेअळी , मावा, तुडतुडे, व पांढरी माशी या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो. यासाठी किडींची ओळख, नुकसानीचा प्रकार व व्यवस्थापनाविषयी माहिती असणे आवश्यक आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धत वापरल्यास उत्पादनखर्चात कपात तर होईलच, शिवाय प्रभावी कीड नियंत्रण सुद्धा मिळेल.
1) ठिपक्‍यांची बोंड अळी (इरियास व्हायटेला): भेंडी पिकात प्रामुख्याने शेंडे व फळे पोखरणारी अळी या किडीमुळे कोवळ्या शेंड्याचे तसेच फळांचे नुकसान होते. या किडीची मादी निळसर रंगाची अंडी कोवळ्या शेंड्यावर, कळ्यांवर, फळांवर घालते. अळी तपकिरी पांढरट ठिपक्‍यांची असते. कोवळे शेंडे, फळे यांमध्ये छिद्र पाडून प्रादुर्भाव करते. सुरवातीच्या अवस्थेपासून ही कीड भेंडी पिकात नुकसान करत असते. या किडीची कोषावस्था होडीसारख्या कापडी पिशवीच्या आकारात फळावर, पानांखालीच पूर्ण होते. पतंगांचे पंख हिरव्या रंगाचे असतात. त्यावर पांढरे पट्टे असतात. 
2) तंबाखूची पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा लिट्युरा) ही अळी पाने व फळे खाते. बहुपीकभक्षी वर्गातील कीड असल्यामुळे वर्षभर या किडीचा प्रादुर्भाव शेतात दिसून येतो. त्यामुळे नुकसान जास्त होते. या किडीची मादी पानाच्या पाठीमागे पुंजक्‍यात अंडी घालते. अळ्या अतिशय खादाड असतात. अळी मोठ्या झाल्यावर फळ कुरतडून खाते. या किडीची कोषावस्था जमिनीत पूर्ण होते.
 
3) घाटेअळी:
 ही कीड बहुपीकभक्षी वर्गातील हिरवी बोंड अळी (हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा) ही अळीसुद्धा भेंडीची पाने खाऊन नंतर भेंडी पोखरून नुकसान करते. मादी कोवळ्या शेंड्यावर, कळ्यांवर, भेंडीच्या कोवळ्या फळांवर पिवळसर पांढरी अंडी एक-एकटी घालते. अंड्यांतून अळ्या बाहेर पडल्यानंतर कोवळ्या भेंडीमध्ये शिरून आतला भाग खातात. अळ्यांनी कोवळ्या फळास नुकसान केल्यास फळाचा आकार वाकडा होतो. त्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट येते. 
4) तुडतुडे:
 तुडतुडे ही भेंडीवरील सर्वात महत्त्वाची रस शोषण करणारी कीड आहे. तुडतुडे पाचरीच्या आकाराचे व हिरवट पिवळे असून पंखावर काळे ठिपके असतात. ते नेहमी तिरके चालतात. या किडीचे प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूस वाढून त्यातील रस शोषण करतात. त्यामुळे सुरुवातीला पाने आकसतात व कडा तपकिरी होतात.                      
5) पांढरी माशी:
 रोगाचा माशी ही भेंडीवरील रस शोषक कीड असून विषाणूजण्य रोगाचा प्रसार करते. प्रौढ माशी आकाराने लहान असून पंख पांढुरके असतात व शरीरावर पिवळसर झाक असते. डोक्यावर मध्यभागी दोन तांबडे ठिपके असतात. पिल्ले पानाच्या खालच्या बजूने आढळतात. त्यांचा रंग फिकट पिवळा किंवा पिवळा असतो. ते एका ठिकाणी स्थिर राहतात. पांढऱ्या माशीचे प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने रस शोषण करतात. याशिवाय पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने रस शोषण करतात. याशिवाय पिल्ले आपल्या शरिरातून गोड चिकट द्रव बाहेर टाकतात. त्यामुळे पाने चिकट होतात. त्यावर बुरशीची वाढ होते व पानाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर अनिष्ठ परिणाम होतो.                                        
6) मावा:
 मावा पिवळसर किंवा काळा गोलाकार असून त्याच्या पाठीवर मागच्या बाजूने सूक्ष्म अशा दोन नलिका असतात. मावा व त्यांची पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने व कोवळ्या शेंड्यावर समूहाने राहून त्यातील रस शोषण करतात. याशिवाय शरिरातून गोड चिकट द्रव बाहेर टाकतात. कालांतराने त्यावर काळी बुरशी चढते व झाडाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. 
एकात्मिक नियंत्रण व्यवस्थापन -
१) उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करावी, त्यामुळे जमिनीतील किडींच्या सुप्तावस्था उन्हामुळे व पक्षी खावून नष्ट होतील.
२) किडींच्या पर्यायी खाद्य वनस्पती उपटून नष्ट कराव्यात.
३) भेंडीची वेळेवर लागवड करावी व खताची योग्य मात्र वापरावी. नत्राचा अतिरिक्त वापर करू नये.
४) पिकाची फेरपालट करावी.
५) लागवडीपुर्वी बियाण्यास ७० टक्के थायोमिथॉक्झॉंम / इमिडाक्लोप्रीड ५ ग्रॅम प्रति किलो या प्रमणात बियाण्यास बीज प्रक्रिया करावी.
६) किडग्रस्त भेंडी तोडून अळीसहीत नष्ट करावीत.
७ ) ठिपक्याची अळी व घाटेअळी यांची कामगंध सापळे शेतामध्ये सर्व्हेक्षणासाठी प्रति हेक्टरी ५ या प्रमाणात लावावे.
८ ) पांढऱ्या माशीसाठी पिवळे किंवा चिकट सापळे प्रति हेक्टरी १० लावावेत.
९ ) किटकनाशकाचा अनावश्यक वापर टाळावा. त्यामुळे परभक्षी कीटक जसे ढालकिडा, क्रायसोपा, सिराफिड माशी, कोळी, भक्षक ढेकूण इत्यादी व परोपजीवी कीटक जसे ट्रायकोग्राम, रोगस, ब्रॅकॉन इत्यादींचे संरक्षण होईल. त्यामुळे हानीकाराक किडींचे नैसर्गिकरित्या नियंत्रण होण्यास मदत होईल.
१०) ठिपक्याची अळी व घाटेअळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामाची अंडी ५०,००० प्रति हेक्टरी शेतामध्ये सोडावीत. 
११) पांढरी माशी व इतर लहान किडींच्या नियंत्रणासाठी क्रायसोपाच्या २ अळ्या प्रति झाड सोडावेत.
१२) घाटेअळीच्या नियंत्रणासाठी एचएएनपीव्ही २५० एलई प्रति हेक्टरी वापर करावा.
१३ ) घाटेअळीचा / ठिपक्याच्या अळीचा प्रादुर्भाव दिसताच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
१४ ) रासायनिक किटकनाशकाचा वापर फक्त किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच करावा. किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडताच खालील कीटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
v  घाटेअळीचा / ठिपक्याच्या अळीकरिता
Ø  ईमामेक्टिन बेन्झोएट ५ एस.जी. -४ ग्राम प्रती पंप ,
Ø   क्लोराट्रनीलीप्रोल १८.५ ई सी – ३ मिली प्रती पंप
Ø  क्विनॉलफोस २५ टक्के इसी- २० मिली प्रती पंप,
v  पांढरी माशी, मावा व तुडतुडे ;
Ø    ऑक्सिडीमिटोन मिथाईल २५ ईसी -१० मिली
Ø    इमीडाक्लोप्रीड १७.८ टक्के प्रवाही २ मिली
१५) कामगंध सापळ्यांचा वापर - कामगंध सापळ्यांचा वापर केल्याने किडीची आर्थिक नुकसानीची पातळी तसेच प्रतिबंधात्मक फवारणी घ्यावी की नाही हे समजते. कामगंध सापळे हेक्‍टरी पाच-दहा या प्रमाणात शेतात लावावेत. सापळा पिकाच्या वरती साधारणपणे अर्धा-एक फूट राहील याप्रमाणे लावावा. त्यातील ल्युर लावताना हातास कांदा, लसूण यांसारख्या उग्र पदार्थांचा वास नसावा, तसेच कामगंध सापळ्यांचे पक्षी, मांजर, कुत्रे यांच्यापासून संरक्षण होईल याची काळजी घ्यावी. पावसाळ्यात सापळ्यात पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी. दर तीन-चार आठवड्यांनंतर नियमितपणे खालीलप्रमाणे ल्युर बदलावेत. 
v  हिरवी बोंड अळी, हेलिकोव्हर्पा अर्मिजेरा    -हेलिल्युर 
v  तंबाखूची पाने खाणारी अळी, स्पोडोप्टेरा लिट्युरा   -स्पोडोल्युर 
v   शेंडे व फळे पोखरणारी अळी इरियास व्हायटेला/इन्सुलॅना   -इरिल्युर 
१६) स्पोडोप्टेराचे अंडीपुंज वेळीच नष्ट केल्यास पुढील प्रादुर्भाव टाळण्यास मदत होते. 
१७) भेंडी खुडणीच्या वेळी निघणाऱ्या किडलेल्या भेंड्या अळ्यांसह नष्ट कराव्यात.
 
१८) भेंडी पिकात मक्‍यासारख्या पिकाची लागवड केल्यास मित्रकीटकांचे संवर्धन होऊन नैसर्गिक कीडनियंत्रणास चालना मिळते. मका पिकावर बसणाऱ्या पक्ष्यांद्वारे अळ्या वेचून खाऊन नैसर्गिक नियंत्रणच होते.

    अशाप्रकारे भेंडीवरील किडींची ओळख करून योग्य पद्धतीने एकात्मिक कीड व्यवस्थापना करून भेंडीचे भरघोस उत्पादन घ्यावे.

लेखक -  किरण बुधवत (सहाय्यक प्राध्यापक), श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती

No comments:

Post a Comment