Thursday, 15 December 2016

बिजप्रक्रीये पासूनच करा गव्हावरील रोगांचा बंदोबस्त

     गहु हे भारतातील रब्बी हंगामध्ये घेतले जाणारे महत्वाचे पीक आहे. उत्पादन व उत्पादकते मध्ये हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान व बिहार हे प्रमुख राज्ये आहेत. महाराष्ट्रा मध्ये देखील रब्बी हंगामामध्ये गहु उत्पादन घेतले जाते, परंतु वरती नोंदविलेल्या राज्यांच्या तुलनेत आपल्या राज्यातील शेतकर्‍यांची प्रती हेक्टरी उत्पादकता कमी आहे, असे आढळून येते. भारतातील एकूण क्षेत्रापैकी २९.८ मी. हेक्टर एवढे क्षेत्र गहू पिकाच्या लागवडीखाली आहे. गहू या पिकाच्या क्षेत्रा मध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत असले, तरी या पिकावरील रोग व किडींच्या प्रादुर्भावामुळे योग्य ते उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही. गव्हावर प्रामुख्याने तांबेरा (गेरवा), काजळी किंवा कानी करपा, मर, मुळकुज, खोडकुज आणि कर्नाल बंट या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. गहू पिकावर प्रामुख्याने बुरशीजन्य रोग दिसून येतात त्यांपैकी तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव सर्वात मोठ्या प्रमाणात दिसून येतो. खोडावरचा काळा तांबेरा, पानावरचा नारंगी तांबेरा, पिवळा तांबेरा या तांबेऱ्याचा प्रसार होत असतो. तसेच गव्हावर येणाऱ्या विविध किडीचे बंदोबस्त करण्यासाठी पिकांच्या उत्पनामध्ये आधुनिक पिक संरक्षण पद्धतीचा अवलंब करणे महत्वाचे आहे. पिक संरक्षणात खर्च कमी करून प्रभावी कीड व्यवस्थापण, पिकाचे कमीत कमी नुकसान व उच्च प्रतीचे उत्पन्न मिळविण्यासाठी एकात्मिक रोग आणि कीड व्यवस्थापन पध्दती वापरणे आवश्यक आहे.
गव्हावरील प्रमुख रोग
१) तांबेरा
      हा गव्हावरील प्रमुख आणि नुकसानकारक रोग आहे. गव्हावरील तांबेरा हा अतिशय हानिकारक आहे. त्यामुळे दाणे सुकतात व जिऱ्यासारखे दिसू लागतात. या महत्त्वपूर्ण रोगाचे सखोल संशोधन जगभर झाले आहे. योग्य बुरशीनाशकांचा वापर व तांबेरा प्रतिकार जातींच्या वापरामुळे या रोगाचे व्यवस्थापन करणे शक्‍य आहे.
     या रोगाचे प्रमुख तीन प्रकार आहेत, म्हणजेच खोडावरचा काळा तांबेरा, पानावरील नारिंगी तांबेरा आणि पिवळा तांबेरा.
अ)   खोडावरचा काळा तांबेरा :-
      हा रोग पक्सीनिया ग्रामिनीस ट्रिटीसी या बुरशीमुळे होतो. पिक ओंबीच्या अवस्थेत असताना हा रोग दिसून येतो. या रोगाची लक्षणे पानांवर, खोडावर आणि ओंबीवर दिसतात. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर तपकिरी रंगाचे फोड/पुरळ खोडावर व पानांवर दिसून येतात हे या रोगाचे प्रमुख लक्षणे आहेत. अशाप्रकारे हे फोड/पुरळ पूर्ण पानांवर व खोडावर पसरत जातात. या फोडांचा/पुरळांचा आकार लांबट गोलाकार असा असतो. असंख्य प्रमाणात हे फोड/पुरळ आल्यास ते एकमेकांमध्ये मिसळतात. जर हाताचे बोट यावरून अलगद फिरवल्यास तपकिरी भुकटी बोटास लागते. जसजसे तापमान वाढत जाते तसतसा खोडावरील काळा तांबेरा वाढत जातो. रोपांमधील अन्नद्रव्य शोषून या बुरशीची परिपूर्ण वाढ होते, त्यामुळे या बुरशीचे बीजाणू पानांचा पापुद्रा फाडून बाहेर आलेले दिसून येतात. पिकाची पूर्णावस्था व तापमान वाढल्यास कालांतराने हे फोड पुढे काळसर रंगाचे होतात त्यामुळे या रोगास खोडावरचा काळा तांबेरा असे संबोधले जाते. या रोगाच्या वाढीस तापमान सुमारे १५सें ते ३५सें. इतके आवश्यक असते व आर्द्रता ही पुरेशी लागते. रोगग्रस्त झालेल्या रोपांपासून कमी प्रमाणात फुटवे निर्माण होऊन उत्पन्न कमी मिळते.

    ब)    पानावरील नारंगी तांबेरा :-

      हा रोग पक्सीनिया रेकॉनडिटा या बुरशीमुळे होतो.नारंगी तांबेऱ्याची लक्षणे व प्रादुर्भाव प्रामुख्याने पानांवर व देठांवर आढळून येतात. सुरुवातीस गोलाकार नारंगी रंगाचे लहान फोड/पुरळ हे पानांवर व देठांवर दिसून येतात. हे फोड सुरुवातीस पानाच्या वरच्या भागांवर दिसतात, कालांतराने दोन्ही भागांत हे फोड/पुरळ दिसून येतात. या बुरशीच्या वाढीस लागणारे प्रतिकूल तापमान १५सें ते २५सें इतके आवश्यक असते.

 क)   पिवळा तांबेरा :-
      हा रोग पक्सीनिया स्ट्रीफोरमीस या बुरशीमुळे होतो. या रोगामध्ये पिवळ्या रंगाचे बारीक फोड/पुरळ पानांच्या शिरांवर सरळ रेषांत दिसून येतात. गव्हावरील पिवळा तांबेरा हा रोग प्रामुख्याने थंड हवामान असलेल्या ठिकाणी आढळून येतो. या रोगाची तीव्रता जास्त आद्रर्ता व पर्जन्यवृष्टीच्या ठिकाणी दिसून येते. या रोगाच्या वाढीस लागणारे तापमान २ते १५सें इतके आवश्यक आहे. 


तांबेरा रोगाचे प्रसार :-
      तांबेरा रोगाची बुरशी हि फक्त गहू पिकावर आपले अस्तित्व टिकवू शकते. मैदानी प्रदेशात गव्हाची काढणी झाल्यास या बुरशीचे बीजाणू पूर्णपणे नाश पावतात. दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील निलगिरी व पलनी टेकड्यांवर या तांबेरा रोगाची बुरशीचे अस्तित्व वर्षभर दिसून येते. त्या दरम्यान (उन्हाळी किंवा गैरहंगामी पिक) तेथील शेतकर्यांनी लावलेल्या गहू पिकावर किंवा स्वयंरुजीत गव्हावर या बुरशीचा प्रादुर्भाव वर्षभर दिसून येतो. दक्षिण समुद्रात नोव्हेंबर महिन्यानंतर वादळी वारांच्यामार्फत या बुरशीचे बीजाणू निलगिरी व पलनी टेकड्यांवरून त्यांचे प्रसारण होते. या बुरशीचे बीजाणू वादळी पावसाबरोबर हवेमार्फत १८०० कि.मी. इतक्या अंतरापर्यंत वाहून जातात. जर अशावेळी मैदानी प्रदेशात जर गहू पिकाची लागवड केली असेल व रोगास अनुकूल परिस्थिती असेल तर या बुरशीचे बीजाणू तिथे रुजते व रोगाचे प्रमाण वाढते त्यामुळे बिजानुंचेही प्रमाण वाढून ते हवेमार्फत निरोगी गव्हावर पुन्हा रुजून येतात, त्यामुळे तांबेरा रोगाचा प्रसार अधिक वाढतो. 
तांबेरा रोगाचे व्यवस्थापन :-

            रोगाचा प्रादुर्भाव होताच १५ दिवसांच्या अंतराने प्रोपीकोनाझोल २०० मि.ली. २०० लीटर पाणी या प्रमाणात या बुरशीनाशकाची फवारणी करावी.
Ø  या बुरशीनाशकाला पर्याय म्हणून मँन्कोझेब दोन ग्रँम प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
Ø  रोग दिसताच एम – ४५, १.५ किलो ५०० ली. पाण्यातून फवारावे. गरज भासल्यास दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी पुन्हा करावी. या रोगाच्या नियंत्रणासाठी रोग प्रतिकारक्षम जातींची निवड करावी.
Ø  त्याचप्रमाणे गव्हाची पेरणी हंगामापुर्वी किंवा उशिरा करू नये.
Ø  रासायनिक खतांची मात्रा संतुलित प्रमाणात असावी.
Ø  नत्र खतांचे प्रमाण जास्त झाल्यास गव्हाचे पिक तांबेरा रोगास जास्त प्रमाणात बळी पडतात. पिकास योग्य वेळी नत्रखताची मात्रा द्यावी.
Ø  पिकास अति पाणी देणे टाळावे कारण जास्त पाणी दिल्याने शेतातील हवामान जास्त दमट राहून तांबेरा रोगाच्या प्रसारणास मदत होते.
Ø  भारी जमिनीत पिकास पाणी देताना पाणी जरुरीपुरते व बेताचे द्यावे.
Ø  साधारणपणे मध्यम ते भारी जमिनीत १८ ते २१ दिवसांच्या अंतराने व हलक्‍या जमिनीत १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या एकूण तीन ते चार पाळ्या द्याव्यात. अति पाणी दिल्याने त्या शेतातील हवामान जास्त दमट होऊन तांबेरा रोगाच्या फैलावास मदत होते.

२) काजळी किंवा काणी
      हा रोग युस्टीलँगो ट्रिटीसी या बुराशीमुळे होतो. ही बुरशी गहू पिकाच्या फुलांनवर वाढते. दाण्याऐवजी काळी भुकटी तयार होते. ही काळीभुकटी म्हणजेच काणी. या रोगाची थंड आणि आर्द्र हवामानात अधिक वाढ होते.
काजळी किंवा काणी रोगाचे व्यवस्थापन :-
Ø  रोगमुक्त बियाणे वापरावे.
Ø  वापरण्यापूर्वी चार तास बियाणे थंड पाण्यात भिजवावे व त्यानंतर उष्ण पाण्याची प्रक्रिया ५४ अंश (सेल्सियस) तापमान असलेल्या पाण्यात १० मिनिटे बुडवून काढावे. त्यानंतर सावलीत वाळवावे.
Ø  उभ्या पिकातल्या रोगट ओंब्या काळजीपूर्वक काढून नष्ट कराव्यात. काणीग्रस्त रोगट झाडे दिसताच ती नष्ट करावी.
Ø  ३ ग्रॅम कार्बेनडँझिम किंवा थायरम १ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी, म्हणजे या रोगाचे नियंत्रण होऊ शकते.
३)     करपा
      या गहू पिकावरच्या रोगाची लागण अल्टरनेरिया ट्रिटीसिना नावाच्या बुरशीमुळे होते. कोरडवाहू पेक्षा बागायती गव्हावर जास्त प्रमाणात अल्टरनेरिया करपा हा रोग येतो. रोगाचे प्रमाण जास्त वाढल्यास करप्याचे ठिपके एकत्र मिसळतात आणि संपूर्ण पान करपते. १९ ते २० सेल्सियस तापमान, सतत दमट हवामानात या रोगाचा प्रसार होतो.
करपा रोगाचे व्यवस्थापन :-
      Ø  पेरणीसाठी रोगमुक्त शेतातील बियाणे वापरावे.
      Ø  ३ ग्रॅम थायरमची बिजप्रक्रिया करावी.
      Ø  उभ्या पिकावर २ ग्रॅम मँन्कोझेब १ लिटर पाण्यातून फवारावे.
     Ø  रोगाचा प्रादुर्भाव दिसताच  मॅन्कोझेब (०.२ टक्का) ही  फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.
४)  मुळकुज आणि खोडकुज :-
     गव्हावर फ्युजारिम या बुरशीमुळे मुळकुज तर रायझोक्टोनिया या बुरशीमुळे खोडकुज या रोगाचा प्रादुर्भाव होतो. या रोगांचा एकत्रित परिणाम म्हणजे रोपेपिवळी पडून सुकायाला लागतात आणि शेवटी मरतात. खोडाचा जमीनीलगताचा भाग आणि मुळे कुजतात आणि झाडे कोलमडून पडतात.
रोगाचे व्यवस्थापन :-
Ø सुरवातीला थायरमची बीजप्रक्रिया करावी.
Ø याच्यावर उपाय म्हणजे अशी झाडे उपटून टाकावित.
 ५)     कर्नाल बंट :-
      हा रोग टिलेशिया इंडिका नावाच्या बुरशिमुळे होतो. अत्यंत भयानक रोग आहे. गव्हाच्या ओंब्या आणि दाने काळे पडतात. त्याचा मासळीच्या वासासारखा अतिशय घाणेरडा वास येतो. त्यामुळे असा गहु खाण्यास योग्य राहतच नाही. उत्तर भारतात या रोगाचे प्रमाण जास्त आहे, पण आपल्याकडे या रोगाचे प्रमाण अजून आढळून आलेले नाही.
रोगाचे व्यवस्थापन :-
      Ø  हा रोग बियाण्याद्वारे पसरतो. म्हणून थायरमची बीजप्रक्रिया करावी (३ ग्रॅम प्रति किलो बियाणे) .
      Ø  रोगमुक्त प्रमाणित बियाणे वापरावे.
      Ø  रोगट अवशेष गोळा करुन जाळून टाकावे.
    Ø  जमिनीतील बुरशीच्या नायानाटासाठी खोल नांगरट करावी. अशा पध्दतीने घाण वास येणाऱ्या (कर्नाल बंट) या रोगाच्या नियंत्रनाचे उपाय योजवेत.
     Ø  निरोगी गहु उत्पादनासाठी नुकसानकारक अशा या रोगाचे निर्मूलन करावे आणि अपेक्षित उत्पादन मिळवावे.
 ६)     दाण्यावरील बुरशी (ग्रेन मोल्ड) :-
Ø गव्हावरील या रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेनडँझिम (०.१%) + थायरम (०.२ %) किंवा ओरिओफंगीन (२०० पी.पी.एम.) + कॅप्टन (०.२ %) किंवा डायथेन एम. ४५ (०.२ %)+ कॅप्टन (०.२ %) या बुरशीनाशकांची फवारणी फुलोऱ्यानंतर करावी. दुसरी फवारणी १५ दिवसानंतर किंवा दाणे पक्व अवस्थेत असताना करावी. पाऊस आला तरच तिसरी फवारणी करावी. अशाप्रकारे या बुरशीचे नियंत्रण करता येते.
      अशाप्रकारे गव्हावरील रोगांच्या नियंत्रणासाठी आपल्याला एकात्मिक व्यवस्थापन पध्दतीचा वापर करता येईल. या पध्दतीचा अवलंब केल्याने रोगनियंत्रणाचा खर्च कमी होऊन रसायनांच्या अयोग्य वापरामुळे होणारी निसर्गाची हानीही टाळता येईल. 


लेखक : - डॉ. अमोल विजय शितोळे आणि संदेश व्यंकटेश पवार (पी. एच. डी. कृषि) डॉ. पंजाबराव  
         देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला
[Agrowon] is good, have a look at it! http://epaper.agrowon.com/…/17Dec2016/Normal/Pune/page11.htm
गहू पिकावरील रोग नियंत्रण http://m.agrowon.com/newsdetails.aspx…

No comments:

Post a Comment