उन्हाळयामध्ये वाढत्या
तापमानामुळे सध्याच्या काळात फळबागेतील ओलावा टिकवून ठेवणे खूप गरजेचे आहे. तीव्र
उन्हामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन जास्त प्रमाणात होते व फळझाडला नियमित
लागणार्या पाण्यामध्ये घट होते. फळझाडाची ही पाण्याची घट परिपूर्ण करण्यासाठी व
झाडाला पुरेसे पाणी मिळावे म्हणून झाडाच्या बुंध्याशी आच्छादन करावे.
फळझाडांच्या बुंध्याशी पालापाचोळा, भुसा, उसाचे पाचट, गव्हाचे
किंवा भाताचे काड, वाळलेले गवत, केळीची
वाळलेली पाने इत्यादी तसेच विविध रंगाचे प्लॅस्टिक पेपर यांचा वापर करून एक पातळ
थर तयार करावा. त्यामुळे वातावरण आणि जमीन यामध्ये एक पडदा तयार होतो. यालाच
आच्छादन असे म्हणतात.
आच्छादनाचे
प्रमुख दोन प्रकार पडतात -
१) सेंद्रिय
आच्छादन - झाडांची वाळलेली पाने, भुसा, उसाचे पाचट, गव्हाचे किंवा भाताचे काड, वाळलेले गवत, केळीची वाळलेली पाने इत्यादीचा वापर
सेंद्रिय आच्छादन म्हणून होतो.अशा प्रकारच्या आच्छादनांचा फायदा म्हणजे ते लवकर
कुजतात व त्याचे सेंद्रिय खतामध्ये रूपांतर होते. त्यातून
निघणार्या कार्बन डायऑक्साइड वायुचा फळझाडांना फायदा होतो. आच्छादनामुळे जमिनीचे
तापमान संतुलित ठेवले जाते तसेच जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. सेंद्रिय
आच्छादनामुळे सुमारे ५० टक्क्यापेक्षाही जास्त पाण्याची बचत होते.
२) प्लॅस्टिक
पेपरचे आच्छादन – प्लॅस्टिक पेपर आपल्याला विविध
रंगात उपलब्ध आहेत. सुरुवातीच्या काळात काळ्या व पारदर्शक रंगाचे प्लॅस्टिक आच्छादनासाठी
वापरण्यात येत होते. परंतु आता काळ्या व पारदर्शक रंगा व्यतिरिक्त दुहेरी रंगाचे, हिरवट, विटकरी, चंदेरी इ.
रंगाचे प्लॅस्टिक पेपर वापरात आहेत. या प्रकारच्या आच्छादनाचा वापर करून २५ ते ३०
टक्क्यापर्यंत पाण्याची बचत करू शकतो.
आच्छादन
करण्याची पद्धत –
सेंद्रिय
आच्छादन करत असतांना प्रथम झाडाखालील दगड, धोंडे इ.
बाजूला करून जागा साफ करून घ्यावी. त्यावर ७ ते ८ से.मी.
जाडीचा सेंद्रिय आच्छादनाचा एकसारखा थर तयार करून घ्यावा. आच्छादन केल्यानंतर
त्वरित संपूर्ण आच्छादन भिजेल एवढे पाणी द्यावे. त्या सोबतच थोडासा यूरिया टाकणे
गरजेचे आहे कारण सेंद्रिय पदार्थांचे विघटन होत असतांना जमिनीतील नत्राचा वापर होत
असतो. त्यामुळे झाडाला नत्राची कमतरता पडू नये म्हणून ही उपाययोजना करावी.
आच्छादनातील घटक आणि
त्याचा रंग, जमिनीवर पसरलेल्या आच्छादनाची जाडी, वेळ व आच्छादन कुजण्याच्या क्रियेचा वेग ह्या सर्व बाबींवर सेंद्रिय
आच्छादनाचा परिणाम अवलंबून असतो. जमीन आणि वातावरणाची परिस्थिति या गोष्टीवर
आच्छादनातील सेंद्रिय पदार्थ कुजण्याचा वेग अवलंबून असतो. गव्हाच्या काडापेक्षा
भाताच्या काडाचे आच्छादन लवकर कुजते तसेच उसाचे पाचट कुजण्यास वेळ लागतो.
प्लॅस्टिक
पेपरचा आच्छादन म्हणून वापर करतांना झाडाखालील दगड, धोंडे, काडी, कचरा
इ. बाजूला करून जागा साफ करून घ्यावी. जमिनीची योग्य मशागत करून घ्यावी.
प्लॅस्टिक पेपरला हव्या त्या आकारात म्हणजे चौकोनी किंवा गोल आकारात कापून घ्यावे
व नंतर ते झाडाच्या बुंध्याशी जमिनीच्या पृष्ठभागास चिकटून राहील अश्याप्रकारे अंथरावे.
नंतर पेपरचे पूर्ण काठ मातीने झाकून घ्यावे त्यामुळे ते जमिनीत फिट्ट बसतील व
हवेने उडणार नाही. ठिबक सिंचनाची सोय असल्यास प्रथमतः ते अंथरूण घ्यावे व त्यावर
प्लॅस्टिक पेपर अंथरावा.
राष्ट्रीय फलोत्पादन
अभियांनांतर्गत फलोत्पादन पिकांसाठी ( फळपिके, भाजीपाला
इ॰) नियंत्रित शेती या घटकांतर्गत प्लॅस्टिक आच्छादनाचा कार्यक्रम राबविण्यात
येतो. सदर अभियानाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तीन ते चार महीने कालावधीच्या
पिकांसाठी उदा. भाजीपाला, स्ट्रॉबेरी इ. पिकांसाठी २५
मायक्रोन जाडीचे प्लॅस्टिक आच्छादन पेपर, मध्यम कलावधीसाठी
येणार्या पिकांसाठी ( ११ ते १२ महीने) उदा. फलपिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या
काळात, पपई, केळी इ. पिकांसाठी ५०
मायक्रोन जाडीचा, तसेच जास्त कालावधीच्या पिकांसाठी (१२
महिन्यापेक्षा अधिक) १०० ते २०० मायक्रोन जाडीचे प्लॅस्टिक आच्छादन वापरावे.
नवीन फळबागेत आच्छादन करतांना खालील बाबी
लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
पीक
लागवडीचे योग्य नियोजन करावे. जमिनीची योग्य मशागत करावी. शिफारशींनुसार पिकास
आवश्यक त्या खतांच्या मात्रा द्याव्यात. पिकाच्या लागवडिनुसार वाफे तयार करावेत.
प्लॅस्टिक पेपर वाफ्यावर पसरवून नंतर रोप लागवडीसाठी आच्छादनाला छिद्र पाडावे.
आच्छादनात शिफारशी नुसार योग्य अंतरावर छिद्र पाडून त्या ठिकाणी रोपे व्यवस्थित
लावावीत. पिकांना पाणी देण्यासाठी शक्यतो ठिबक सिंचनाचा वापर करावा, त्यामुळे उपलब्ध पाण्याचा पुरेपूर फायदा घेता येईल.
आच्छादनाचे फायदे -
१) जमिनीच्या
सूक्ष्म हवामानात सुधारणा होते. त्यामुळे जमिनीतील सूक्ष्म जिवाणू वाढण्यास अनुकूल
वातावरण मिळते.
२) बाष्पीभवन
कमी झाल्याने जमिनीत ओलावा टिकून राहतो.
३) तणाचा
प्रादुर्भाव कमी होतो. त्यामुळे पिकाची व तणाची पाण्यासाठी होणारी स्पर्धा कमी
होते.
४) खतांचा
निचरा कमी होतो व खतांचा योग्य वापर होतो.
५) सेंद्रिय
आच्छादनात पावसाचे पाणी जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून न जाता जमिनीत मुरते
त्यामुळे जमिनीची धूप कमी होते.
६) आच्छादनामुळे
झाडांना खते व पाणी व्यवस्थितरीत्या मिळते, त्यामुळे
मुळांची तसेच झाडांची
जोमदार वाढ होते.
७) आच्छादनामुळे
व ओलाव्यामुळे जमिनीतील गांडूळांची संख्या व कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.
८) उन्हाळ्यात
दोन पाण्याच्या पाळ्यातील कालावधी वाढविता येतो.
९) आच्छादनामुळे
उपलब्ध ओलावा जास्त काळ टिकल्याने फळपिकांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
लेखक – १) स्वप्नील
ज्ञा. देशमुख (पी.एच.डी. विद्यार्थी) डॉ. पी. डी. के. व्ही., अकोला आणि
२)
किरण बुधवत (सहाय्यक
प्राध्यापक),
श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती
No comments:
Post a Comment