Sunday, 11 December 2016

पिकांवरील जैविक रोगनियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा एक प्रभावी बुरशीनाशक



         पिक संरक्षण व कृषी संवर्धन किंबहूना एकूणच कृषी विकासाच्या दृष्टीने जैविक किड व रोग व्यवस्थापन सारख्या संकल्पना अलीकडील काळात पुढे येऊ लागल्या आहेत. रासायनिक खातांप्रमाणेच किटकनाशके व बुरशीनाशके यांचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येते. भाजीपाला, फळे व इतर पिकांना बुरशीचा व किडींचा उपद्रव होऊ नये म्हणून रासायनिक बुरशीनाशके व किटकनाशके वापरल्याने नैसर्गिक अन्नसाखळी विस्कळीत होऊन एकुणच पर्यावरणास हानीकारक ठरतात.
        निसर्गाने स्वतःच अनेक गोष्टींचा समतोल साधण्याची व्यवस्था केलेली आहे. निसर्गातील काही जैविक घटक यात महत्त्वाचे कार्य पार पाडत असतात. त्यापैकीच ट्रायकोडर्मा ही एक परोपजीवी, जमिनीत आढळणारी व इतर रोगकारक बुरशींचा नायनाट करते. ती इतर रोगकारक बुरशीचे धागे नष्ट करून बीजाणू कमकुवत बनविते. त्यामुळे त्यांची गुणन क्षमता कमी होऊन रोगकारक बुरशीची वाढ थांबते.
        ट्रायकोडर्मा बुरशी जमीन/ बियाणेद्वारा प्रसारित होणाऱ्या विविध रोगांचे नियंत्रण करते. फळबाग, भाजीपाला, कापुस, डाळवर्गीय व गळीत धान्यावर येणाऱ्या मूळ/रोपे सडणे, रोपे कोलमडणे, मर व तत्सम रोगांचे नियंत्रण करते.
        ट्रायकोडर्मा बुरशीचा शोध ‘परसून’ या शास्त्रज्ञाने १७९४ मध्ये लावला आणि भारतात ‘ठाकुर व नोरिश’ यांनी १९२८ साली मद्रास येथील जमिनीतुन लावला.
ट्रायकोडर्मा बुरशीची शास्त्रीय माहिती पुढीलप्रमाणे :
कुळ     : बुरशी
वर्ग     : डयुटेरोमायकोटिना
उपवर्ग   : हायपोमायसिटीडी
ऑर्डर    : मोनिलियासी
जनेरा    : ट्रायकोडर्मा
        ट्रायकोडर्मा बुरशीच्या अनेक प्रजाती आहेत त्यापैकी ट्रायकोडर्मा हारजिएनम व ट्रायकोडर्मा व्हीरीडी या दोन प्रजाती रोगनियंत्रणाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. या बुरशीचे प्रयोगशाळेमध्ये संवर्धन करुन शेतकऱ्यांना रोगनियंत्रणाकरता उपलब्ध होऊ शकते. 
              ट्रायकोडर्मा बुरशी खालील जमिनीत वाढणाऱ्या रोगकारक बुरशींचे नियंत्रण करते. ट्रायकोडर्मा बुरशी खालीलप्रमाणे कार्य करुन रोगकारक बुरशींचा नायनाट करते.
१. जागा / अन्नासाठी स्पर्धा :
        ट्रायकोडर्मा बुरशी जमिनीत वाढत असताना इतर रोगकारक बुरशींशी जागा व अन्नासाठी स्पर्धा करते. यात ट्रायकोडर्मा इतर रोगकारक बुरशींच्या तुलनेत जलद अन्न द्रव्यांचे शोषण करीत असल्यामुळे जमिनीत अन्नद्रव्यांची कमतरता येते. अन्नद्रव उपलब्ध न झाल्यामुळे रोगकारक बुरशी कमकुवत होऊन नाश होतो. तसेच ट्रायकोडर्मा बुरशीचे कवकतंतु पिकांच्या मुळांवर पातळ थरात वाढतात व त्या आवरणामुळे रोगकारक बुरशींचे कवकतंतु मुळांमध्ये प्रवेश करू शकत नाही.
२. परोपजीविकता :
        ट्रायकोडर्मा ही परजीवी बुरशी असल्यामुळे जमिनीतील तंतुमय धागे रोगकारक बुरशींच्या धाग्यांमध्ये प्रवेश करतात. प्रवेश करण्याआधी रोगकारक बुरशींच्या धाग्यांभोवती ट्रायकोडर्मा तिच्या तंतुमय धाग्यांचा विळखा घालून रोगकारक बुरशींमधील अन्नद्रव्यांचे शोषण करते त्यामुळे रोगकारक बुरशी कमकुवत होऊन नष्ट होते.
३. अॅन्टिबायोसिस :
        ट्रायकोडर्मा बुरशी जमिनीत वाढत असताना काही रोगप्रतिकारके व जैव रसायनांची निर्मिती करते. यामुळे रोगकारक बुरशींच्या वाढींवर त्यांचा विपरीत परिणाम होऊन वाढ थांबवते उदा. ट्रायकोडर्मा व्हीरीडी ही परोपजीवी बुरशी जमिनीत विरीडीन ग्लायोटॉकझीन यासारख्या प्रतीजैविक रसायनाचे स्त्रावण करते यामुळे इतर रोगकारक बुरशींचा नायनाट होतो.
ट्रायकोडर्मा वापरण्याची पध्दत :
१. बिजप्रक्रीया :
     ट्रायकोडर्मा हि बुरशी वापरण्याची सर्वसाधारण व उपयुक्त अशी पध्दत म्हणजे बिजप्रक्रीया. पेरणीचे वेळी ४ – ५ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बियाण्यास ट्रायकोडर्मा पावडरची बिजप्रक्रीया करावी. सर्व बियाण्यांवर सारखा थर होईल याची काळजी घ्यावी व बियाणे सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी.

२. मातीप्रक्रिया :
        जमिनीमार्फत प्रसार होणाऱ्या रोगकारक बुरशींच्या नियंत्रणासाठी १ ते २.५ किलो ट्रायकोडर्मा भुकटी २५ ते ३० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळुन एक हेक्टरी क्षेत्रात पसरवुन दयावी व शक्य असल्यास पाणी दयावे.
३. द्रावणात रोपे बुडविणे :
        मिरची, वांगी, फुलकोबी, पानकोबी इत्यादी भाजीपाल्याची गादी वाफ्यावर रोपे तयार झाल्यानंतर लागवडीपूर्वी ट्रायकोडर्माच्या द्रावणात बुडवावीत. ट्रायकोडर्मा पावडर ५०० ग्रॅम ५ लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे व त्यात रोपाची मुळे ५ मिनिटे बुडवून नंतर त्याची लागवड करावी.
ट्रायकोडर्मा बुरशीचे फायदे :
१. नैसर्गिक घटक असल्यामुळे या बुरशीचा पर्यावरणावर कोणताच विपरित परिणाम होत नाही.
२. ट्रायकोडर्मामुळे रोगकारक बुरशींमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होण्याची शक्यता कमी होते.
३. जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे विघटन होऊन जमिनीची पोत सुधारण्यास मदत होते.
४. बिजप्रक्रीया केल्याने उगवणशक्ती वाढून बिजांकुरण जास्त प्रमाणात होते.
५. हानिकारक / रोगकारक बुरशींचा नायनाट होतो.
६. पिकाचे संपूर्ण वाढीच्या काळात कमी खर्चात जास्त फायदा होतो.
ट्रायकोडर्मा बुरशीचा प्रभावी वापर करण्यासाठी आवश्यक बाबी :
१. ट्रायकोडर्माची कार्यक्षमता वाढविण्यासाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थ भरपूर प्रमाणात मिसळावेत.
२. ट्रायकोडर्मा बुरशीचे पाकीट / द्रावण थंड जागेत सुर्यप्रकाशात दूर ठेवावे.
३. रासायनिक बुरशीनाशक लावलेल्या बियाण्यास  ट्रायकोडर्माची मात्रा दुप्पट करावी.
४. ट्रायकोडर्मा सोबत रायझोबियम / अॅझोटोबॅक्टर / अॅझोस्पिरीलम तसेच स्फुरद विरघळणारे जीवाणूंचा जैविक खतांची बीज प्रक्रिया करता येते.
अशाप्रकारे ट्रायकोडर्मा जैविक बुरशीचे एकात्मिक रोग व्यवस्थापनाच्या संकल्पनेमध्ये महत्त्वाचे स्थान आहे.
लेखक : - अमोल विजय शितोळे (पी. एच. डी. कृषि) डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला
 


No comments:

Post a Comment