निसर्गामध्ये
विशेषत शेतामध्ये विविध प्रकारचे जैविक अवशेष सतत तयार होत असतात. ज्यामध्ये
प्रामुख्याने काडीकचरा, पालापाचोळा, गवत, जनावरांचे शेण, पिकांची धसकटे, कुटार,
ऊसाचे पाचट, गुरांनी न खालेला चारा ह्यांचा समावेश होतो. सेंद्रिय खत (कंपोस्ट)
तयार करून शेतात टाकल्यास आपल्या परिसरातील योग्य विल्हेवाट लागते. ज्यामध्ये
कचऱ्याचे विघटन होऊन परत त्याचे रुपांतर माती, पाणी व वायू या तिन्ही नैसर्गिक
तत्वात होऊन परिसर स्वच्छ होण्यास मदत होते. सोबतच जमिनीचा कस व जलधारणा शक्ती
वाढून पोषण द्रव्याचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो. जमीन भुसभुशीत होते व त्यामुळे
हवा खेळती राहते. नैसर्गिक स्वरुपात अन्न मिळाल्याने पिकांची जोमाने वाढ होते व जमिनीतील
उपयुक्त सुक्ष्मजीवांची वाढ होण्यास मदत
होते. रासायनिक खतांच्या वापराने उत्पादनात वाढ होत असली तरी जमिनीचा पोत सुधारून
तिची उत्पादन क्षमता टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचे महत्त्व मोठे
आहे. सेंद्रिय खते तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ शेतक-यांना सहज उपलब्ध असल्याने
या प्रकारची खते तयार करणे शेतक-यांना आर्थिकदृष्टय़ा फायद्याचे ठरत आहे.
सेंद्रिय
खतांमध्ये सहजरीत्या तयार करता येणारे खत म्हणजे कंपोस्ट खत म्हणता येईल. कंपोस्ट
खतासाठी झाडांचा पालापाचोळा, टाकाऊ गवत, गोठय़ातील काडीकचरा, जनावरांचे मलमूत्र, टाकाऊ
मासळीचे अवशेष, शेतातील तण, पिकाची धसकटे, भुसा, पेंढा, कोंडा आदी निसर्गात
सहजरीत्या उपलब्ध होणा-या पदार्थाचा वापर करता येतो. इतकेच काय गाजर गवताचा
कंपोस्ट खात तयार करण्यासाठी चांगला उपयोग होतो. कंपोस्ट खत तयार करण्यासाठी
आपल्या शेतात आवश्यक त्या आकाराचा खड्डा
तयार करावा. हा खड्डा शक्यतो उंच जागी असावा.
काडीकचऱ्यापासून खत तयार करण्यासाठी पुढील बाबींचा विचार
करणे आवश्यक आहे.
कंपोष्ट खडडयाची जागा व त्याचा आकार :
कंपोष्ट
खडडयाची जागा शक्यतो जनावरांच्या गोठयाजवळ आणि उंच जागेवर असावी. खडडयाची रूंदी
२ मीटर, खोली १ मीटर व लांबी आवष्यकतेनुसार ५ ते १० मीटर पर्यंत ठेवावी आणि
दोन खडडयांमधील अंतर २ ते ३ मीटर असावे. खडडयाचे वळण व बाजू थोडया ठोकून टणक
कराव्यात.
कंपोष्ट खताची पुर्व तयारी व खड्डा
भरणे :
उपलब्ध
असलेला सर्व काडीकचरा, कृषी अवशेष एका ठिकाणी गोळा करावेत. शक्यतो टणक फांदया, पऱ्हाटया, तुराटयाचे जमतील तेवढे लहान तुकडे करावेत. न कुजणाऱ्या वस्तू जसे काच
, प्लास्टीक पिशव्या वेगळया काढाव्यात. फार ओले असलेले गवत सुकू द्यावे व साठवलेला
कचरा भरण्यापुर्वी चांगला मिसळून घ्यावा आणि थरावर थर रचून खडडा भरावा.
अंदाजे ३०
सें.मी. जाडीचा थर भरून चांगला दाबावा. त्यावर कचरा ओलसर होईल एवढे युरीया व सुपर
फाँस्फेटचे पाण्यात मिसळून तयार केलेले द्रावण शिंपडावे. हयासाठी अंदाजे ५-६
बादल्या (४० लिटर) पाणी, १ किलो युरीया व २ किलो सुपर फाँस्फेट हे प्रमाण घ्यावे.
कृषी अवशेष कुजण्यासाठी रॉक फोस्फेट चा १० ते २० कि. प्रती टन माध्यम असा वापर
करावा. जुने शेणखत असल्यास १ घमेले शेणखत हया द्रवाणात मिसळावे तसेच कुजवण्याच्या
क्रियेत भाग घेणारे सुक्ष्मजीवाणू १ टन कचऱ्यासाठी १ पाकीट (१ किलो ग्रॅम ) हया प्रमाणात पाण्यात मिसळून
प्रत्येक थरानंतर वापरावे व खडडा ३०-६० सें.मी. जमिनीपासून उंच भरावा. पूर्ण
भरलेला खडडा शेणामातीने लिपून घ्यावा. जेणेकरून आतील हवामान व आर्द्रता कायम राहून
१२ आठवडयात चांगले कंपोस्ट खत तयार होईल. यासाठी दर ३० दिवसांनी खड्ड्यातील माध्यम
वर खाली करून घ्यावे व खड्डा पुन्हा बंद करावा.
वरील पध्दतीने तयार केलेले कंपोस्ट खत पुर्ण कुजून तयार झाले किंवा
नाही ते खालील चाचण्या घेऊन ठरवावे :
·
खडडयातील खताचे आकारमान कमी होऊन ३० ते ६० टक्क्यांवर
येते.
·
उत्तम कुजलेले खत मऊ होते व सहज कुस्करले जाते.
·
खताचा रंग तपकिरी किंवा गर्द काळा होतो.
·
खताच्या खडडयातील तापमान कमी होते.
·
चांगल्या कुजलेल्या खतास दुर्गंधी येत
नाही.
लेखक : - अमोल विजय शितोळे (पी. एच. डी.
कृषि) डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला
No comments:
Post a Comment