Monday, 12 December 2016

शेतमशागात एकात्मिक रोगव्यवस्थापनाची गुरुकिल्ली



     आपल्या देशातील मुख्य पिकावर आढळणाऱ्या प्रमुख रोगांपैकी बरेचसे रोग निरनिराळ्या प्रकारच्या बुरशीमुळे होतात. कवकामुळे होणाऱ्या रोगांपैकी काहींचा प्रसार हवेमार्फत, बियाण्यामार्फत, मातीद्वारा होतो तर काही रोगांचा प्रसार हा शेतातील रोगट अवशेशामुळे  होत असतो. मशागतीय रोग व्यवस्थापनामुळे अशा प्रकारच्या पिकांवरील रोगांना नियंत्रणात आणता येईल. अश्या प्रकारच्या रोगव्यवस्थापणे मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश करता येईल, याची आपण सविस्तर माहिती घेऊयात.
शेतातील पिक निरोगी राहण्यासाठी -  
   १.   शेतातील धसकटे, रोगट पाने- रोगट फळे, काडीकचरा जाळून नष्ट करावा.
   २.    मे महिन्यात शेताची खोल नांगरणी करावी.
   ३.    रोगमुक्त बियाण्याची पेरणीसाठी निवड करून, बियाण्यास बीज प्रक्रिया करावी.
   ४.    शेणखताचा भरपूर प्रमाणात वापर करावा.
   ५.    योग्यवेळी पेरणी करावी.
   ६.    रासायनिक खतांचा योग्य प्रमाणात वापर करावा.
   ७.    बुरशीनाशकाची फवारणी करावी.
   ८.    पिकांची फेरपालट करावी.
   ९.    पाण्याचे नियोजन करावे.
  १०.    पेरणीसाठी रोग प्रतिकारक वाणांची निवड करावी.
  ११.    जैविक रोग नियंत्रण करावे.
आता आपण पाहिलेल्या मुद्यांची, आपण सविस्तर माहिती घेऊयात...
  १)  शेतातील धसकटे, रोगट पाने, रोगट फळे, काडीकचरा जाळून नष्ट करणे :
पिकाची कापणी झाल्यानंतर शेतातील पालापाचोळा, पिकाची व तणांची धसकटे गोळा करावीत. पालापाचोळा व धसकटे शेताचे बाहेर इतरत्र फेकून न देता एका ठिकाणी गोळा करावीत व जाळून टाकावीत. जेणेकरून पालापाचोळा व धसकटे यामध्ये रोगांना कारणीभूत ठरणारी बुरशी पुढील हंगामापर्यंत जिवंत राहणार नाही व रोगांचा प्रसार टाळता येईल.
  २)   मे महिन्यात शेताची खोल नांगरणी करणे :
पिकावरील काही रोगांची बुरशी जमिनीत वास्तव्य करते. मातीद्वारा होणारा प्रसार टाळण्याकरिता शेताची मे महिन्यात खोलवर नांगरणी करावी जेणेकरून नांगरणी केल्यामुळे जमिनीचे आत असणारी बुरशी जमिनीचे पृष्ठभागावर येईल व उष्ण तापमानामुळे बुरशीचा नायनाट होईल.
  ३)   बियाण्यास बीज प्रक्रिया करणे :
कवकामुळे होणाऱ्या रोगांपैकी काहींचा प्रसार हा बियाण्यामार्फत होतो. काही रोगांची बुरशी बियांच्या पृष्ठभागावर चिकटून असते तर काही रोगांची बुरशी भृणकोषात असते. या दोन्ही प्रकारच्या बुरशींचा नायनाट करणेकरिता बियाण्यास बीज प्रक्रिया करणे आवश्यक ठरते. उष्णजल बीज प्रक्रिया, सौरउर्जा वापरून बीज प्रक्रिया आणि बुरशीनाशक वापरून केलेली बीज प्रक्रिया असे बीज प्रक्रियेचे वेगवेगळे प्रकार आहेत.
  ४)  शेणखताचा भरपूर प्रमाणात वापर करणे :
रायझोक्टोनिया, स्क्लेरोशियम किंवा फ्युजॅरियम यासारख्या जमिनीमध्ये वास्तव्य करणाऱ्या बुरशींचे नियंत्रण करण्याकरता शेणखताचा वापर करावा. प्रती हेक्टरी २५ ते ३० बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत टाकावे. शेणखतामुळे बॅसीलस सबटीलीस यासारख्या उपयोगी  जीवाणूंची संख्या वाढते. हे जीवाणू मातीत निर्माण करीत असलेल्या प्रती जैविकामुळे जमिनीतील रोगकारक बुरशींचे नियंत्रण होते.
  ५)  योग्यवेळी पेरणी करणे :
कृषी विद्यापीठाने सुचविल्याप्रमाणे योग्यवेळी पेरणी केल्यामुळे मुळकुज, खोडकुज, पानांवरील करपा ई. रोगांचे नियंत्रण होते. तसेच पेरणीचे अंतर योग्य ठेवल्यास पिकामध्ये हवा खेळती राहील व योग्य तापमान राहण्यास मदत होईल.
  ६)  रासायनिक खतांचा योग्य प्रमाणात वापर करणे :
नत्रयुक्त रासायनिक खतांचा जास्त प्रमाणात वापर केल्यास पिक रोगास बळी पडू शकते. त्यासाठी रासायनिक खतांचा योग्य प्रमाणात वापर करणे आवश्यक असते.
  ७)  बुरशीनाशकाची फवारणी करणे :
आवश्यक असते. बुरशीनाशकाची फवारणी करताना शिफारशीत मात्राच वापरावी. बुरशीनाशक पाण्यात मिसळून मगच पंपात टाकावे.
  ८)  पिकांची फेरपालट करणे :
मूळकुजणे या रोगाची बुरशी (पिथियम) जमिनीत वास्तव्य करत असल्यामुळे सतत एकच एक पिक घेतल्यास या बुरशीचे प्रमाण वाढते. बुरशीचे प्रमाण कमी करण्याकरता पिकांची फेरपालट करणे आवश्यक आहे.
  ९)  पाण्याचे नियोजन करणे :
पिकाच्या वाढीच्या सर्वच टप्यावर पाण्याचे योग्य व्यवस्थापन असणे आवश्यक असते. काही वेळा जास्त पाणी दिल्यामुळे जमिनीतून रोगकारक बुरशीचा प्रादुर्भाव व प्रसार होतो त्यमुळे पाण्यचे योग्य नियोजन आवश्यक असते.
  १०)  पेरणीसाठी रोग प्रतिकारक वाणांची निवड करणे :
ज्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या शेतात जास्त होतो अश्या रोगकारक सुक्ष्मजीवास प्रतिकारक जातीची निवड करावी.
  ११)  जैविक रोग नियंत्रण करणे :
मुळकुज (रायझोक्टोनिया किंवा स्क्लेरोशियम बुरशींमुळे होणारा रोग) तथा मर रोगाचे नियंत्रणाकरिता ट्रायकोडर्मा या बुरशीचा वापर करता येतो. ज्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव अत्यंत कमी होण्यास मदत होते.
     अशाप्रकारे रोगांच्या नियंत्रणासाठी आपल्याला एकात्मिक व्यवस्थापन पध्दतीचा वापर करता येईल. चांगल्यारीतीची शेतमशागात पध्दतीचा अवलंब केल्याने रोगनियंत्रणाचा खर्च कमी होऊन रसायनांच्या अयोग्य वापरामुळे होणारी निसर्गाची हानीही टाळता येईल. आपण आज घेतलेल्या माहितीचा अवलंब करून, आपण आपल्या पिकांचे भरगोस असे उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा.

लेखक : - अमोल विजय शितोळे (पी. एच. डी. कृषि) डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला

4 comments: